सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी विरोधक सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:09+5:302021-01-04T04:20:09+5:30
संदीप बावचे लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी विरोधक आपली ...

सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी विरोधक सरसावले
संदीप बावचे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी विरोधक आपली रणनीती ठरवत आहेत. ग्रामीण भागात निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरु असून, प्रतिस्पर्धी कोणता उमेदवार माघार घेतो, याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे. त्यातच बंडखोरांचीही मनधरणी केली जात आहे.
जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे घमासान सुरु आहे. अर्ज छाननीनंतर काहीजणांना सदस्यपदाची लॉटरी लागली आहे तर काही जागा बिनविरोधदेखील झाल्या आहेत. याचवेळी गावची निवडणूक बिनविरोध करुन काही ग्रामपंचायतींकडून एकीचा संदेशही देण्यात आला आहे. पुढील वर्षभरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही होणार आहेत. विधानसभा मतदार संघातील गावांच्या निवडणुका तालुका नेत्यांनी प्रतिष्ठेच्या बनवल्या आहेत. त्यामुळे या नेत्यांचे गावाकडे लक्ष लागून राहिले आहे. पॅनेलमधून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांना साकडे घातले जात आहे. त्यामुळे स्थानिक पुढाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचे अनेकांचे मनसुबे दिसून येत आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
............
माघारीकडे लक्ष
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार (दि. ४) हा अंतिम दिवस आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या पाहता, भाऊगर्दी झाली आहे. यामध्ये विजयात अडसर ठरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी रविवारी नेतेमंडळींकडून अनेकांची मनधरणी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे आज माघार कोण घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
............
निवडणुकीचा धुरळा उडणार
लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी लक्षात घेता, या निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे आहे. मात्र, तरुणांचा वाढता सहभाग आणि स्थानिक पातळीवरील इर्षेचे राजकारण यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार, असेच चित्र निर्माण झाले आहे. एकूणच सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.