करवीर एमआयडीसीला विरोध

By Admin | Updated: November 20, 2014 00:01 IST2014-11-19T23:55:44+5:302014-11-20T00:01:11+5:30

ग्रामस्थांची निदर्शने : भूसंपादनाच्या चर्चेविनाच परतले अधिकारी

Opponents to Karveer MIDC | करवीर एमआयडीसीला विरोध

करवीर एमआयडीसीला विरोध

कोल्हापूर : नियोजित करवीर औद्योगिक वसाहतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेस हलसवडे, नेर्ली, विकासवाडी, कणेरीवाडी गावांतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आज, बुधवारी भूसंपादन क्र. ६ चे उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी भूसंपादनाबाबत वाटाघाटी करण्यासाठी हलसवडे (ता. करवीर) येथील ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती; पण ग्रामस्थांनी आम्हाला जमिनी द्यायच्याच नाहीत, असा पवित्रा घेत बैठकीवर बहिष्कार टाकला; तसेच काळ्या फिती लावून निदर्शने केली. त्यामुळे पवार यांच्यासह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील, करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांना चर्चेविनाच परत यावे लागले.
करवीर औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनाच्या कामास सुरुवात झाली आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी संबंधित ग्रामस्थांना नुकसान भरपाईचा दर निश्चित करण्यासाठी नोटीस काढली आहे. त्यानुसार आज हलसवडे ग्रामस्थांसोबत वाटाघाटी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते; पण ग्रामस्थांनी औद्योगिक वसाहतीसाठी जमीन न देण्याचा निर्धार केल्यामुळे ही बैठक सुरू होण्याअगोदरच गुंडाळण्यात आली. करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण ग्रामस्थ ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
कागल पंचतारांकित वसाहतीसाठी आधीच जागा दिली आहे; त्यामुळे आता औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देणार नाही, असा पवित्रा हलसवडे येथील ग्रामस्थांनी घेतला. दरम्यान, पहिल्याच टप्प्यात ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध केल्यामुळे नियोजित करवीर औद्योगिक वसाहतीला आता अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Opponents to Karveer MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.