जयसिंगपूरच्या भुयारी गटार योजनेला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:06 IST2017-07-18T23:06:30+5:302017-07-18T23:06:30+5:30
उदगावला सभेत निर्णय : उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाडसह नऊ गावे एकत्र

जयसिंगपूरच्या भुयारी गटार योजनेला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क -उदगाव : ग्रामीण भागात शुद्ध पाणी नसल्याने सध्या अनेक गावांत दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत जयसिंगपूर शहराला भुयारी गटार योजना मंजूर झाली आहे. मात्र, भुयारी गटार योजनेचे सांडपाणी कृष्णा नदीपात्रात सोडू देणार नाही, यासाठी कृष्णाकाठावरील सर्व गावांनी ग्रामसभेत भुयारी गटार योजनेच्या विरोधात ठराव केला आहे. तो जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदनद्वारे देणार आहे.
उदगाव येथे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रभाग सभा उदगाव ग्रामपंचायत कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी जि. प.च्या सदस्या स्वाती सासने होत्या. यावेळी कृष्णाकाठावरील उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, कनवाड, कुटवाड, घालवाड, हसूर या गावांतील सरपंच व पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर भुयारी गटार योजनेला विरोध दर्शविला.
उदगावच्या सरपंच स्वाती पाटील म्हणाल्या, उदगावचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. जयसिंगपूर भुयारी गटार योजनेला विरोध असून, ओढा स्वच्छ करावा. घालवाडच्या सरपंच प्रतीक्षा परीट यांनी मराठी शाळेला शिक्षक देण्याची मागणी केली, तर कुटवाडच्या सरपंच सुकन्या पाटील यांनी स्वच्छ पाणी, स्मशानभूमी, वीज, औषधे यांची मागणी केली.
उपसभापती कविता चौगुले, पं. स.चे सदस्य मन्सूर मुल्लाणी यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री केदार यांनी स्वागत, विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांनी प्रास्ताविक केले. शाखा अभियंता एस. एस. देशमुख, बी. आर. चव्हाण, अनंत माने, फारुख नालबंद, पंकज मगदूम, शिवाजी कोळी, गटविकास अधिकारी काळगे, सविता ठोमके, प्रमोद चौगुले, सुनील चौगुले, अनिल सुतार, प्रकाश बंडगर, सुरेखा गडदू, प्रज्ञा मगदूम, लता वरेकर, पूजा कोळी, माधुरी आंबी उपस्थित होते.
योजना आताच बंद पाडूया
जयसिंगपूर शहराने ग्रामीण व कृष्णाकाठावरील जनतेचा विचार न करता फक्त राजकारणाचा वापर करून योजनेला मंजुरी आणली आहे. कृष्णा नदीतील पाणी पिणाऱ्या जनतेला दूषित पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे ही योजना आताच बंद पाडूया, अशी भूमिका कुटवाडचे नवजित पाटील यांनी मांडली.