उचंगी धरणग्रस्तांचा घळभरणीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:44+5:302021-01-08T05:22:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : उचंगी धरणग्रस्तांना विश्वासात न घेता बळजबरीने धरणाची घळभरणी करणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे घळभरणी ...

उचंगी धरणग्रस्तांचा घळभरणीला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : उचंगी धरणग्रस्तांना विश्वासात न घेता बळजबरीने धरणाची घळभरणी करणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे घळभरणी करण्याला आमचा तीव्र विरोध आहे. संकलन रजिस्टर प्रश्नावर धरणग्रस्तांची सहमती घेऊन अंतिम करणे व धरणाचे काम बंद ठेवून तातडीने बैठक घ्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
उचंगीचे धरण गेल्या २० वर्षांपासून रखडले आहे. पुनर्वसनाबाबतच्या अधिकारी व शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे वारंवार संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. मधल्या काळात हा प्रकल्प निधीअभावी थांबला होता. लाभक्षेत्रात जमिनी उपलब्ध नसतानाही ४ एकराचा स्लॅब रद्द करून ८ एकरांचा केला आहे. याबाबत धरणग्रस्तांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत प्रशासनाकडून बेजबाबदारीची, उर्मट व मी सांगतो तेच खरे, अशी उत्तरे दिली गेली आहेत. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम न ठरवता धरणाची धळभरणी करू दिली जाणार नाही. उचंगी धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर दुरूस्त करणे, निर्वाह क्षेत्राबाबत पुनर्वसन कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित खातेदारांना जमीन मान्य करणे, चाफवडे, गावातील धरण पाण्याच्या पातळीलगत असणारा १५० घरांचा प्रस्ताव ताबडतोब मंजूर करणे, धरणाची उंची २ मीटरने कमी गृहित धरून बुडीत क्षेत्रात संपादन केले आहे. परंतु, सध्या २ मीटरने उंची वाढवून काम केले जाणार असल्याने बुडित होणारी जमीन संपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, जमिनीसाठी ६५ टक्के रक्कम भरून घ्यावी, आदेश झालेल्या जमिनीचे वाटप करावे, उजव्या तीरावरील रस्त्याचे काम लवकर सुरू करावे, आदी मागण्या करत या मागणीबाबत तातडीने बैठक घ्यावी. बैठक घेऊन पुढील दिशा ठरेपर्यंत धरणाचे काम बंद ठेवण्यात यावे, असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संजय तर्डेकर, अशोक जाधव, सुरेश पाटील, धनाजी दळवी, प्रकाश मस्कर, दत्तात्रय बापट आदींसह धरणग्रस्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत.