नव्या बसेसचा खुळखुळा

By Admin | Updated: January 13, 2016 01:10 IST2016-01-13T00:36:59+5:302016-01-13T01:10:20+5:30

के.एम.टी.समोर आव्हान : ६ गाड्यांचे कमानपाटे तुटले; दुरुस्तीअभावी दहा गाड्या बंद

Opening of new buses | नव्या बसेसचा खुळखुळा

नव्या बसेसचा खुळखुळा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेतून घेण्यात आलेल्या ७५ नव्या कोऱ्या बसगाड्या रस्त्यावर धावायला सुरू होऊन एक वर्षही झाले नाही तोपर्यंत त्यांचे कमानपाटे तुटायला सुरुवात झाल्याने के.एम.टी. प्रशासनासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. सहा गाड्यांचे कमानपाटे तुटल्याने तसेच अन्य चार गाड्यांना स्पेअर पार्टस् मिळत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून गाड्या बंद राहिल्याने के.एम.टी. प्रशासनाला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून नव्या गाड्या के.एम.टी.च्या ताफ्यात यायला सुरुवात झाली. पुढे सहा महिन्यांपर्यंत एकूण ७५ गाड्या शहराच्या रस्त्यांवर धावायला लागल्या. नव्या कोऱ्या गाड्या असल्याने अडचणीत सापडलेल्या के.एम.टी.ला नवसंजीवनी मिळाली खरी पण आता एक-एक गाडीचा दर्जा स्पष्ट होऊ लागल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.
केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात जवाहरलाल नेहरु नगरोत्थान योजनेतून १०४ बस गाड्या के.एम.टी.ला मंजूर झाल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात पुढाकार घेतला होता. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या गाड्या मिळणार म्हटल्यावर आर्थिक अरिष्टात सापडलेल्या के.एम.टी.ला चांगली मदत झाली; परंतु नव्या गाड्या कोणत्या कंपनीला द्यायची यावर बराच वाद झाला. त्यानंतर अशोक लेलँड कंपनीच्या गाड्या घेण्याचा निर्णय झाला. वर्कआॅर्डर द्यायला झालेला विलंब, नगरसेवकांनी प्रस्ताव मंजूर करायला लावलेला वेळ यात बराच काळ गेल्याने १०४ पैकी ७५ बसगाड्याच के.एम.टी.ला मिळाल्या. उर्वरित गाड्या रद्द झाल्या शिवाय के.एम.टी.साठी अद्ययावत वर्कशॉप उभारणीसाठीचा निधीही रद्द झाला. दरम्यानच्या काळात केंद्रात सत्तापरिवर्तन होऊन भाजप सरकार आले. या सरकारने ही योजनाच रद्द करून टाकली. त्यामुळे २९ गाड्यांसाठी तसेच वर्कशॉप उभारण्यासाठी निधी मिळाला नाही.
नवी गाड्या असल्याने देखभाल दुरुस्तीचा खर्च के.एम.टी.ला करावा लागणार नाही, परिणामी उत्पन्न वाढून संस्था फायद्यात येण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केला होता; परंतु एक वर्ष व्हायच्या आतच गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत सहा गाड्यांचे कमानपाटे तुटले आहेत तसेच चार गाड्यांचे अन्य स्पेअर पार्ट खराब झाले असल्याने बंद आहेत. सध्या दहा गाड्या बुद्ध गार्डन येथील यंत्रशाळेत बंद अवस्थेत धूळखात पडल्या आहेत. अन्य काही गाड्यांही वेगवेगळ्या कारणाने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मंगळवारी एकूण १६ गाड्या बंद स्थितीत होत्या. वॉरंटी पीरियडमध्ये गाड्यांची दुरुस्ती व देखभाल कंपनीमार्फत करण्यात येत आहे परंतु दुरुस्तीसाठी लागणारे स्पेअर पार्टस् यायला विलंब होत असल्याने गाड्या यंत्रशाळेत लावाव्या लागत आहेत.
नव्या गाड्यांचे कमानपाटे तुटणे आणि विविध कारणांनी त्या बंद पडणे यामुळे यंत्रशाळेतील कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुळात अशोक लेलँड कंपनीच्या गाड्या घेण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध होता. तो डावलून त्या घेण्यात आल्या आहेत, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


नव्या गाड्यांचे कमानपाटे तुटणे अनपेक्षित आहे. सहा गाड्यांचे कमानपाटे तुटले असून त्या दुरुस्त करण्यात येत आहेत. गाड्या धावताना अशा घटना घडतात. गाड्या बंद राहिल्याने आर्थिक नुकसान होते हे खरे असले तरी दुसरा पर्याय नाही.
- एम. डी. सावंत,
यंत्रशाळा व्यवस्थापक

Web Title: Opening of new buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.