सर्वसामान्यांसाठी मंत्रालय खुले : जानकर

By Admin | Updated: July 11, 2016 01:14 IST2016-07-11T01:14:52+5:302016-07-11T01:14:52+5:30

शिरोळमध्ये भव्य सत्कार : दोन्ही मंत्र्यांची कार्यकर्त्यांकडून मिरवणूक

Open to the public: Knowing | सर्वसामान्यांसाठी मंत्रालय खुले : जानकर

सर्वसामान्यांसाठी मंत्रालय खुले : जानकर

शिरोळ : शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन ज्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं, तेच आमच्यावर आज टीका करीत आहेत. जोपर्यंत मी व खासदार राजू शेट्टी आहोत, तोपर्यंत तुम्हाला सत्ता मिळू देणार नाही, असा इशारा अजित पवार यांना देत सर्वसामान्य जनतेसाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदैव मंत्रालय खुले राहील, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.
येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने नूतन मंत्री महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांचा नागरी सत्कार ऐतिहासिक शिवाजी चौकात करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवाप्पा बरगाले होते. तत्पूर्वी, शहरातील प्रमुख मार्गांवरून नूतन मंत्र्यांची मिरवणूक काढण्यात आली.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, मी व महादेव जानकर यांचा पक्ष सत्तेत असला तरी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावरची लढाई करण्यासाठी मी एकटा पुरेसा आहे. तुम्ही सभागृहात राहून जनतेचे प्रश्न मार्गी लावा. आगामी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही. निष्ठेचे फळ म्हणून सदाभाऊंना मंत्रिपद मिळाले. तथापि, त्यांनी न विसरता कार्यकर्त्यांना बळ द्यावे.
वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, जोपर्यंत बिल्ला आहे, तोपर्यंत भाव आहे. बिल्ला उतरताच क्षणिक मान-सन्मान मिळणाऱ्यांना भविष्यात कोणीही विचारणार नाही, असा टोला आमदार उल्हास पाटील यांचे नाव न घेता लगावला.सचिन शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी भगवान काटे, जालिंदर पाटील, जि. प. बांधकाम सभापती सीमा पाटील, पं. स. सभापती सुवर्णा अपरास, अनिता माने, सागर शंभूशेटे, आदी उपस्थित होते.
साडेतीनशे वर्षांचे काम करू : सदाभाऊ
कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, आम्हाला सत्तेतील साडेतीन वर्षे मिळणार असली तरी साडेतीनशे वर्षांचे कार्य करून दाखवू. आमदार जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना चळवळ सभागृहातही दाखवा, असा मौलिक सल्ला दिला असला तरी आम्ही ३० वर्षे चळवळीत घालविली. आता यापुढे त्यांनाच ३० वर्षे रस्त्यावर चळवळ करण्याची संधी मिळावी, आम्ही सभागृहातच राहू. शेतकरीच आम्हाला सत्तेचे वाटेकरी बनण्याचे बळ देणार आहेत.

Web Title: Open to the public: Knowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.