‘पीटीएम’चा नादच खुळा!
By Admin | Updated: September 2, 2015 00:01 IST2015-09-02T00:01:34+5:302015-09-02T00:01:34+5:30
डॉल्बी हद्दपारसाठी पुढाकार : कोल्हापुरात पहिला डॉल्बी आणणारे मंडळ

‘पीटीएम’चा नादच खुळा!
कोल्हापूर : कोल्हापुरातील पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम)ची ओळख नामांकित फुटबॉल संघासोबत दरवर्षी अनंत चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीतील एक महत्त्वाचे मंडळ म्हणून आहे. मात्र, डॉल्बीमुळे होणारे दुष्पपरिणाम लक्षात घेता मंडळाने यंदापासून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन विधायकतेचे पाऊल टाकले. निर्माल्य दान, मूर्तीदान नंतर कोल्हापूरचा गणेशोत्सव आता डॉल्बीमुक्तीच्या दिशेने निघाला आहे. कोल्हापुरात गणेशोत्सव मिरवणुकीत पाटाकडील तालीम मंडळाच्यावतीने प्रथम डॉल्बी आणला होता. यासह विमानातून मिरवणुकीत मंडळाच्या गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी, नाशिक ढोल पथक अशा आकर्षणामुळे ‘पीटीएम’ची विसर्जन मिरवणूक वेगळे आकर्षण ठरते. यंदा मात्र डॉल्बीला फाटा देत फक्त पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढण्याचा निर्णय गणेशोत्सव समितीने घेतला आहे. डॉल्बीचा खर्च विधायक उपक्रमांसाठी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.असे आहेत पदाधिकारी मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळाचे एस. वाय. सरनाईक अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आहेत. यासह रावसाहेब सरनाईक, पी. जी. पाटील, पांडबा जाधव, संभाजी मांगुरे-पाटील, संदीप सरनाईक, राजू पाटील, संपत जाधव यांच्यासह मंडळातील ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन करतात. यंदाची गणेशोत्सव कमिटीच्या उपाध्यक्षपदी कमलेश शिंदे, सेक्रेटरी सचिन कोळी, उपसेक्रेटरी संतोष शिंदे, खजानिस धनंजय विचारे हे काम पाहत आहेत.
कोल्हापुरात प्रथम आमच्या मंडळाने मिरवणुकीत डॉल्बी आणला होता. डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम व यावर खर्च होणारे पैसे या गोष्टींचा विचार करून उत्सव समितीने यंदा डॉल्बीमुक्त मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. डॉल्बीसाठी होणारा खर्च आम्ही विधायक कामांसाठी वापरणार आहे. - कपिल हवालदार,अध्यक्ष, पीटीएम गणेशोत्सव समिती