कालकुंद्रीनजीकची उघडी डी.पी. ठरतेय जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:58+5:302021-05-05T04:40:58+5:30
कालकुंद्री-कुदनूर मार्गावर वीज वितरण कंपनीतर्फे बसवलेली डी.पी. गेली सात-आठ वर्षे उघडीच आहे. मुख्य रस्त्यावर केवळ दोन फूट उंचीवर असलेली ...

कालकुंद्रीनजीकची उघडी डी.पी. ठरतेय जीवघेणी
कालकुंद्री-कुदनूर मार्गावर वीज वितरण कंपनीतर्फे बसवलेली डी.पी. गेली सात-आठ वर्षे उघडीच आहे. मुख्य रस्त्यावर केवळ दोन फूट उंचीवर असलेली ही डीपी लहान मुले व पाळीव प्राण्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. मोडलेला दरवाजा तत्काळ बसवून डीपी बंदिस्त करावी, अशी मागणी होत असून, परिसरातील ग्रामस्थांनी या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अव्वाच्या सव्वा वीज बिले आकारून ती थकवल्यास तत्काळ कारवाई करणाऱ्या वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत अनेक वेळा तोंडी-लेखी विनंती अर्ज देऊनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
या मार्गावरून कालकुंद्री येथील गाय, म्हैस, बैल यांसह पाळीव जनावरे कुदनूर ओढ्याकडे धुण्यासाठी सोडली जातात. मालक मागे राहिलेला असताना बऱ्याचवेळा ही जनावरे या डीपीला आपले अंग घासताना दिसतात. उघड्या फ्यूजला जनावरांचे तोंड, शरीराचा भाग चिकटल्यास किंवा जाता-येता लहान मुलांनी येथे हात लावल्यास गंभीर दुर्घटना घडण्याचा संभव आहे. याबाबत गेल्या सात-आठ वर्षात अनेकदा तोंडी-लेखी सांगूनही वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी या बाबतीत मात्र डोळेझाक करत आहेत. याबाबत परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आठ दिवसात डीपी दरवाजा लावून बंदिस्त न केल्यास कोवाड वीज कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कालकुंद्री ग्रामस्थांनी दिला आहे.
-------------------------
फोटो ओळी : कालकुंद्री-कुदनूर मार्गावरील वीज वितरण कंपनीची डी.पी. गेल्या सात-आठ अशा उघड्या स्थितीत असल्याने नागरिक व जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
क्रमांक : ०४०५२०२१-गड-०५