विद्यापीठाचा परिसर नागरिकांसाठी खुला करा, अन्यथा जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:51+5:302020-12-30T04:30:51+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा परिसर सामान्य नागरिकांना एक जानेवारीपासून मॉर्निंग वॉकसाठी खुला करा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर ...

विद्यापीठाचा परिसर नागरिकांसाठी खुला करा, अन्यथा जनआंदोलन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा परिसर सामान्य नागरिकांना एक जानेवारीपासून मॉर्निंग वॉकसाठी खुला करा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने मंगळवारी दिला. समितीच्यावतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर निदर्शने करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन जानेवारीत विद्यापीठ परिसर खुला करण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिले.
समितीच्या सदस्यांनी मागणीच्या अनुषंगाने घोषणा देत विद्यापीठाचा मुख्य परिसर दणाणून सोडला. त्यानंतर त्यांच्या मागणीचे निवेदन कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी स्वीकारले. लॉकडाऊनमुळे शिवाजी विद्यापीठ परिसरात सकाळी, सायंकाळी व्यायाम, फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिक, खेळाडूंसाठी हा परिसर बंद केला. दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनाने क्रीडांगणे, क्रीडा ॲकॅडमी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने हा परिसर नागरिकांना व्यायाम म्हणून फिरण्यासाठी खुला केलेला नाही. सुमारे ४० वर्षांपासून अनेक नागरिक येथे फिरायला येतात. फिरण्यास बंदी घातल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याची दखल घेऊन विद्यापीठाने ण१ जानेवारीपासून विद्यापीठ परिसर खुला करावा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने या निवेदनाव्दारे दिला. यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, यशवंत वाळवेकर, प्रवीण बनसोडे, नंदकुमार बामणे, प्रफुल्ल पाटील, सुनीलकुमार सरनाईक, महादेव पाटील, भगवान काटे, श्रीकांत भोसले, दुर्गेश लिंग्रस आदी उपस्थित होते.
चौकट
क्रीडागंणे, तंत्रज्ञान विभाग परिसर खुला
विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी व खेळाडूंना विद्यापीठाची क्रीडांगणे, तंत्रज्ञान अधिविभागाचा परिसर फिरण्यास खुला केला आहे. विद्यापीठ परिसर खुला करण्याबाबत विद्यापीठ अधिकार मंडळांच्या व जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे डॉ. नांदवडेकर यांनी सांगितले.
फोटो (२९१२२०२०-कोल-कृती समिती आंदोलन) : कोल्हापुरात मंगळवारी शिवाजी विद्यापीठ परिसर नागरिकांसाठी खुला करावा या मागणीसाठी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने निदर्शने केली.