अरेरे...जिल्हा परिषदेची किती ही तत्परता

By Admin | Updated: September 2, 2014 00:10 IST2014-09-02T00:07:28+5:302014-09-02T00:10:46+5:30

गतवर्षीचे पुरस्कार : गुरुजींच्या ‘आदर्श’ चा आज घाईगडबडीत गौरव

Oops ... how many readiness of Zilla Parishad | अरेरे...जिल्हा परिषदेची किती ही तत्परता

अरेरे...जिल्हा परिषदेची किती ही तत्परता

कोल्हापूर : जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी जाहीर केलेल्या ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’चे वितरण करण्याचे विसरूनच गेले होते. आता यंदाचा शिक्षक दिन शुक्रवारी आल्याने उद्या
(मंगळवारी) या पुरस्कारांचे वितरण होत आहे. जिल्हा परिषदेच्या या तत्परतेची शिक्षकांतही चर्चा रंगली आहे. जे पुरस्कार वितरण करण्यासाठी वेळ नाही ते जाहीरच कशाला करावेत अशीही भावना व्यक्त होत आहे.
वर्षभर विविध कारणांनी हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता. आताही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकते काय असे वाटत असतानाच जिल्हा परिषदेने घाईगडबडीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद दरवर्षी शिक्षक दिनाच्या आधी ‘आदर्श शिक्षक पुरस्कारां’ची घोषणा करते. वर्षभरात भरगच्च कार्यक्रम घेऊन त्याचे वितरण केले जाते. जानेवारीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम जाहीरही करण्यात आला होता. त्यामध्ये जिल्ह्णातील दोन्ही मंत्री, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम नियोजित होता. ‘प्रोटोकॉल’मध्ये हे बसत नसल्याच्या तक्रारी झाल्या. अखेर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी हा कार्यक्रमच रद्द केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कार्यक्रम घेता आला नाही. चार दिवसांत दुसरा ‘शिक्षक दिन’ आला तरी मागील पुरस्काराचे वितरण झाले नसल्याने शिक्षणक्षेत्रातून टीका सुरू होती. अखेर घाईगडबडीत पुरस्कार वितरण उद्या आयोजित केले आहे. सैनिक दरबार हॉल येथे दुपारी दोन वाजता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, शिक्षण सभापती महेश पाटील आदींच्या उपस्थित होणार आहे. (प्रतिनिधी)

किती असतात पुरस्कार..
प्रत्येक तालुक्यास एक याप्रमाणे १२ तालुक्यांचे बारा शिक्षक व दोन विशेष शिक्षक पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. खरेतर या पुरस्कारांची घोषणा एक सप्टेंबरला होवून पाच सप्टेंबरला त्याचे दिमाखात वितरण व्हायला हवे परंतू असे करेल ती जिल्हापरिषद कसली..असाच आजपर्यंतचा अनुभव आहे.
‘पुणे पॅटर्न’चा नुसताच आग्रह
पंचायत समितीच्या सभापती, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव घेऊन त्याची छाननी होईल. या शिक्षकांचे वेगळ्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून थेट शाळेत जाऊन गुणवत्तेचे मूल्यांकन करण्याचा पुणे जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ निवडीचा पॅटर्न आहे. तो यंदा येथील शिक्षकांची निवड करताना राबविण्याचा आग्रह शिक्षण सभापती महेश पाटील यांनी धरला आहे. तो त्यांनी गेल्यावर्षीही धरला होता. परंतू पुढे कांहीच केले नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसांत हे करणे अशक्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: Oops ... how many readiness of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.