तुम्हीच परत आणू शकता चिमुरड्या अनुष्काच्या चेहऱ्यावरील हास्य, समाजाला साद : ट्यूमरने गमावला एक डोळा, शस्त्रक्रियेसाठी हवी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:26+5:302021-07-22T04:16:26+5:30
मुरगूड : संपूर्ण भावविश्व नजरेत सामावून घेऊन आनंदी जीवन जगण्याचा निर्धार घेऊन जन्मलेल्या दोन वर्षाच्या अनुष्काचा एक डोळा ट्युमरमुळे ...

तुम्हीच परत आणू शकता चिमुरड्या अनुष्काच्या चेहऱ्यावरील हास्य, समाजाला साद : ट्यूमरने गमावला एक डोळा, शस्त्रक्रियेसाठी हवी मदत
मुरगूड : संपूर्ण भावविश्व नजरेत सामावून घेऊन आनंदी जीवन जगण्याचा निर्धार घेऊन जन्मलेल्या दोन वर्षाच्या अनुष्काचा एक डोळा ट्युमरमुळे डॉक्टरांनी काढून टाकला आहे. विद्रुप दिसणारा चेहरा बदलण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी सुमारे ११ लाख खर्च अपेक्षित आहे. या चिमुरडीच्या चेहऱ्यावरील हास्य समाजाच्या मदतीतूनच तिला परत मिळणार आहे. त्यासाठीच तिने मदतीची साद घातली आहे. सध्या मुरगूडमधील आजीकडे राहणाऱ्या अनुष्का विनोद तोरसे हिने केलेले आवाहन काळजाला भिडणारे आहे.
कागल तालुक्यातील खडकेवाडा येथील अमृता विनोद तोरसे यांना दोन मुली, पती हॉटेलमध्ये कुठं तरी काम करतात. मोलमजुरी करून अमृता दोन्ही मुलींना प्रेमाने वाढवत आहेत. दोन वर्षांपासून आपल्या आई अंजना शिवाजी नलवडे यांच्याकडेच त्या राहतात. त्यांचीही परिस्थिती गरिबीचीच. अमृताच्या आई पतसंस्थेत भिशी जमा करतात. दोन्ही मुलींसह हे कुटुंब सुखासमाधानाने जगत होते. दोन महिन्यांपूर्वी अनुष्काच्या डोळ्यात पांढरा ठिपका दिसला. किरकोळ काय तरी असेल म्हणून मुरगूडमधील नेत्ररोग तज्ज्ञाकडे तिला दाखवले. त्यांच्या सांगण्यावरून आणखी काही तपासण्या केल्या. निदान झाले, अनुष्काच्या इवल्याश्या डोळ्यात ट्युमर झाल्याचे. तिला तत्काळ मिरजेतील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अनुष्काचा जीव वाचवण्यासाठी तिचा डोळा काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली. आई व आजीही कोलमडून गेल्या. एकमेकीला धीर देत कसेबसे दीड-दोन लाख गोळा करून शस्त्रक्रिया करून घेतली. सध्या ती एका डोळ्याने आलेले संकट दूर करण्याचा प्रयत्न करत आहे; पण अजूनही वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत उपचार घ्यावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पुढील उपचारासाठी सहा केमो आणि विद्रुप झालेला चेहरा दुरुस्त करण्यासाठी सुमारे अकरा लाख खर्च अपेक्षित आहे. आजी-आईसह निरागस अनुष्काच्या चेहऱ्यावर गेलेले हसू परत आणण्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
अमृता विनोद तोरसे
खाते क्रमांक :- 091110110022939
आयएफएससी कोड BKID0000911
बँक ऑफ इंडिया
शाखा :- मुरगूड
फोटो : डोळ्यावरील शस्त्रक्रिया करण्यापूर्वी निरागस अनुष्का