शेट्टी-कोरे समेटाची नुसतीच हवा
By Admin | Updated: September 3, 2014 00:14 IST2014-09-03T00:14:59+5:302014-09-03T00:14:59+5:30
शाहूवाडीचे राजकारण : भारतअप्पाही लढणार

शेट्टी-कोरे समेटाची नुसतीच हवा
कोल्हापूर : शाहूवाडी मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेऊन आमदार विनय कोरे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारतअप्पा पाटील यांच्यात समेट घडवून आणल्याची हवा गेल्या काही दिवसांत शाहूवाडी तालुक्यात व वारणा खोऱ्यात पसरली आहे. असा कोणताही प्रकार झाला नसून, २३ आॅगस्टला मी अमेरिकेला गेलो होतो, आजच भारतात आल्याने ही भेट झाली केव्हा आणि समेट तरी कसा झाला, अशी विचारणा स्वत: खासदार शेट्टी यांनीच केली आहे.
दुसऱ्या बाजूला निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे भारतअप्पा पाटील यांनीही जाहीर केले. संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी नव्याने गावोगावी डिजीटल लावून विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
आमदार विनय कोरे हे नुसते राजू शेट्टी यांचेच राजकीय शत्रू नसून ते ऊस आंदोलनाच्या चळवळीचेही शत्रू आहेत. अशा नेत्यांशी एका निवडणुकीत नव्हे, तर उभ्या आयुष्यात कधीच आपला समेट होणार नसल्याची प्रतिक्रिया खासदार शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत मी दोन माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांची जपणूक मनापासून केली. त्यामध्ये एक शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील व दुसरे शिराळ््याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक. त्यामुळे त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत आपल्याला सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा बाळगण्यात गैर नाही.
अफवा... कार्यकर्त्याकर्त्याकडून विचारणा
शाहूवाडी मतदारसंघातील लढत निवडणुकीपूर्वीच गाजू लागली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून सत्यजित पाटील यांना कामाला लागा असा आदेश दिला आहे. त्यांच्या उमेदवारीस खासदार शेट्टी यांचा विरोध आहे. स्वाभिमानीला ही जागा आपल्याला हवी आहे, त्यांच्याकडून सदाभाऊ खोत व भारतअप्पा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. आमदार कोरे स्वत: जनसुराज्य पक्षातून रिंगणात उतरणार आहेत. त्याशिवाय काँग्रेसचाही उमेदवार रिंगणात असेल. परंतु सध्यातरी कोरे-सत्यजित पाटील व भारतअप्पा यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. भारतअप्पा यांनी या निवडणुकीत माघार घेऊन सावकरांना मदत करावी यासाठी कोरे गटाकडून दबाव आहे. त्यास भारतअप्पा तयार नसल्याने सत्यजित यांना पुढे करून कोरे-शेट्टी व भारतअप्पा यांच्यात समेट झाल्याची हवा मतदारसंघात उठवून देण्यात आली आहे. स्वत: शेट्टी यांनाही मतदारसंघातून त्यासंबंधी आज कार्यकर्त्यांकडून विचारणा झाली.