इमारत बांधणीच्या केवळ चर्चाच
By Admin | Updated: December 9, 2014 23:24 IST2014-12-09T21:14:44+5:302014-12-09T23:24:06+5:30
करवीर पंचायत समिती : बांधकामाबाबत सभागृहात सदस्य बोलत नाहीत

इमारत बांधणीच्या केवळ चर्चाच
रमेश पाटील -कसबा बावडा -‘करवीर’ पंचायत समितीच्या नुतन इमारत बांधणीची चर्चा आता सहा महिन्यानंतर हवेतच विरून गेली आहे. इमारत सध्या आहे त्या जागी बांधायची की शेंडापार्कातील जागेत बांधायची याबाबत सदस्यामध्ये वाद होऊन चक्क दोन गट पडले होते. आता या गोष्टीला सहा महिने झाले.
सहा महिन्यानंतरही इमारतबाबत प्रशासन आणि सदस्य काहीच हालचाल करताना दिसत नाहीत. तसेच सदस्यही या विषयावर सभागृहात बोलत नाहीत. त्यामुळे समितीचा कारभार पत्र्याच्या शेडमध्येच पूर्वीप्रमाणेच अजून काही वर्षे चालत राहील, असे सध्याचे तरी चित्र आहे. करवीर पंचायत समितीची इमारत सध्या ज्या जागेवर आहे, त्या जागेबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या जागेत नवीन इमारत बांधता येत नाही. तसेच शहरात कोठेही अशी मोठी जागा उपलब्ध होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे करवीर पंचायत समितीचे नवीन इमारतीचे स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही.
करवीर पंचायत समितीचे कार्यालय सध्याच्या जागेवरून शेंडापार्क येथे हलवण्याचा प्रयत्न तत्कालीन सभापती दिलीप टिपुगडे यांनी केला होता. परंतु उपसभापती दत्तात्रय मुळीक आणि जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील तसेच समितीच्या अन्य सदस्यांनी या स्थलांतराला विरोध केला. कारण समितीचे सध्याचे कार्यालय सर्वांच्याच सोयीचे आहे. या कार्यालयाजवळच जिल्हा परिषद, सी.पी.आर., तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने लोकांना पंचायत समितीमधील कामे करता येते. परिणामी त्यांचा वेळ आणि प्रवासखर्च वाचतो. त्यामुळे शेंडापार्कातील जागेला विरोध केल्याचे मुळीक यांचे म्हणणे होते. तर सध्याच्या जागेचा वाद न्यायालयात गेला आहे. निकाल केव्हा लागेल हे सांगता येत नाही. तसेच शहरात प्रशस्त अशी मोठी जागा मिळणार नाही म्हणून शेंडापार्कातील जागा योग्य असल्याचे दिलीप टिपुगडे यांचे मत होते. मात्र त्यांना अन्य सदस्यांनी विरोध केला. सदस्यांच्या या वादाला सहा महिने झाले तरी इमारत कोठे बांधायची यावर एकमत सदस्यात झाले नाही.
दरम्यान, या जागेच्या वादाचा प्रश्न सहा महिन्यापूर्वी म्हणजेच जून महिन्यात उपस्थित केला गेला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्याला मासिक सभा झाली. मात्र एकाही सदस्याने नवीन इमारत कोठे बांधणार यावर चर्चाही केलेली नाही.
निधी उपलब्ध होतो, पण एकमत नाही
नवीन इमारत बांधण्यासाठी शासन वाट्टेल तेवढा निधी उपलब्ध करते. सध्या जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, गगनबावडा, आजरा पंचायत समित्या नवीन इमारतीत स्थलांतर झाल्या आहेत. मात्र सुजलाम-सुफलाम म्हणून स्वत:ला मिरवणारी करवीर पंचायत जुन्याच इमारतीमधून आपला कारभार हाकते. समितीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सर्वांच्या सोयीची अशी इमारतीसाठी जागा निवडावी किंवा सध्या आहे त्या जागेबाबत जागामालकांशी काही तडजोड होते का ते पहावे आणि सुंदर इमारत उभारावी, एवढीच अपेक्षा करवीरच्या जनतेची आहे.