कोल्हापूर : शहरातील नागरिकांच्या श्रद्धा आणि भावनेशी जोडल्या गेलेल्या शहरातील धार्मिक स्थळांबाबत सामंजस्यातून तोडगा काढणे शक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील १२७ धार्मिकस्थळे निष्काषित करावी लागणार असून, त्यामुळे समाजात अशांंतता निर्माण होणार नाही आणि न्यायालयाचाही अवमान होणार नाही, अशी व्यावहारिक भूमिका घेतली, तरच हा विषय निकालात निघणार आहे. महानगरपालिका प्रशासनाचा तोच प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील अवैध धार्मिकस्थळे निष्काषित करण्याकरिता सर्व नगरपालिका, महानगरपालिकांना कालबद्ध कार्यक्रम आखून दिला आहे. तीन टप्प्यांत ही कामे करायची आहेत. त्यापैकी अवैध धार्मिकस्थळांची यादी तयार करून ती जाहीर करणे आणि जी धार्मिकस्थळे प्रचलित नियमानुसार नियमित करता येतील ती नियमित करून देणे या दोन टप्प्यांतील प्रक्रिया पूर्ण करायच्या होत्या. महापालिकेनेही ती पूर्ण केली आहे. मनपा प्रशासनातर्फे मार्च, एप्रिल महिन्यांत शहरातील चार विभागीय कार्यालयांतर्गत अवैध धार्मिकस्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ३८० धार्मिकस्थळे अवैध असल्याचे आढळून आले. त्यातील २५३ धार्मिकस्थळे ही नियमानुसार नियमित करण्यात आली. यापैकी बहुतांशी मंदिरे ही खासगी, सामासिक अंतरात, खुल्या जागेत बांधण्यात आलेली आहेत. त्यांच्यापासून वाहतुकीस कसलाही अडथळा होत नाही. शहरात आता १२७ धार्मिकस्थळे अवैध आहेत. ती वाहतुकीस अडथळा ठरणारी, नियमित न करता येण्यासारखी आहेत. त्यामुळे ती निष्काषित करून अन्य ठिकाणी स्थलांतर करणे एवढा एकच पर्याय प्रशासनासमोर आहे.जी धार्मिकस्थळे अवैध ठरली आहेत, त्या ठिकाणी नागरिकांची नेहमी गर्दी होत असते. त्यामुळे अशा धार्मिकस्थळांवर मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे ही मंदिरे डोझर, जेसीबीच्या साहाय्याने पाडायला मनपाची यंत्रणा गेली, तर त्यातून अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच शिवसेना, भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू एकता आंदोलन यांसारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांना न्यायालयाचे आदेश आणि महापालिकेची भूमिका पटवून द्यावी लागणार आहे. सध्याची अवैध मंदिरे स्थलांतर करायची तर ती कोठे करायची याचीही चर्चा अपेक्षित आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अवैध धार्मिकस्थळे निष्काषित करायची आहेत. निष्काषित करावी लागणारी धार्मिकस्थळे विभागीय कार्यालयधार्मिकस्थळांची संख्या १. गांधी मैदान३०२. शिवाजी मार्केट३९३. राजारामपुरी२१४. ताराराणी मार्केट३७एकूण१२७
धार्मिकस्थळांबाबत सामंजस्य हाच पर्याय
By admin | Updated: November 13, 2016 01:12 IST