केवळ एकाच संघटनेचा बोनस गुणासाठी प्रस्ताव
By Admin | Updated: May 28, 2015 00:56 IST2015-05-28T00:02:39+5:302015-05-28T00:56:48+5:30
कोल्हापुरातील स्थिती : खेळाडूंना फटका

केवळ एकाच संघटनेचा बोनस गुणासाठी प्रस्ताव
कोपार्डे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे २५ गुण केवळ उत्तीर्ण होण्यासाठी देण्याची तरतूद आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे किमान ५०० ते ६०० खेळाडू विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा देत आहेत. राज्य क्रीडा परिषद अंतर्गत मान्यताप्राप्त ५२ क्रीडा संघटनांपैकी केवळ एकाच संघटनेने क्रीडा सवलतीच्या गुणासाठी प्रस्ताव पाठविल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे इतर खेळातील खेळाडू विद्यार्थ्यांना या सवलत गुणांचा लाभ होणार नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
२०१४-१५ करिता सवलतीचे क्रीडा गुण मिळण्याबाबतचे प्रस्ताव मार्च २०१५ पर्यंत पाठविणेबाबत विभागीय शिक्षण मंडळांनी संबंधित शाळा, संस्था यांना कळवले होते. यामध्ये ६२ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे, तर ९ ग्रामीण क्रीडा स्पर्धा व १२ महिला क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. संबंधित राज्य संघटनांना संचालनालयास व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना शासन निर्णयानुसार सादर करावयाच्या कागदपत्राबाबत कळविण्यात आले होते. मात्र, या ५२ पैकी केवळ एका संघटनेने आपल्या खेळाडूंच्या सवलतीच्या गुणासाठी (बोनस गुणासाठी) प्रस्ताव दाखल केला आहे.
महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशन या संघटनेने ८ खेळाडूंचे बोनस गुणासाठी प्रस्ताव दाखल केले आहे. जिल्ह्यात विविध खेळात ५०० ते ६०० खेळाडू आहेत. ते या संघटनांशी संलग्न असून, खेळासाठी अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने या खेळाडूंना शासनाच्या निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या बोनस गुणांची गरज निश्चित आहे. पण शासनाने दिलेल्या या सवलतींचा फायदा या खेळाडूंना देण्यास या संघटना अपयशी ठरल्याची माहिती जिल्हा क्रीडा विभागाकडून प्राप्त झाली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील परीक्षेत जे खेळाडू विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार आहेत, त्या विद्यार्थी खेळाडूंना शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे उत्तीर्ण होण्याची संधी मिळते. मात्र, या संघटना प्रस्ताव दाखल करत नसल्याने तोटा होतो. यासाठी शिक्षक, पालक व खेळाडू विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.
- नवनाथ फडतारे,
क्रीडाधिकारी, कोल्हापूर