फक्त गाईचे दूध घालणाऱ्यांचे दूध नाकारणार

By Admin | Updated: September 26, 2015 00:13 IST2015-09-26T00:09:21+5:302015-09-26T00:13:53+5:30

गोकुळच्या सर्वसाधारण सभेत ठराव : गडमुडशिंगीत चारा वीट प्रकल्प कार्यान्वित करण्याचे जाहीर

Only the refined milk of the cow's milk will be rejected | फक्त गाईचे दूध घालणाऱ्यांचे दूध नाकारणार

फक्त गाईचे दूध घालणाऱ्यांचे दूध नाकारणार

कोल्हापूर : म्हशीचे दूध स्थानिक पातळीवर विकून ‘गोकुळ’ला फक्त गाईच्या दुधाचा पुरवठा करणाऱ्यांचे दूध यापुढे नाकारण्यात येईल, असा ठराव शुक्रवारी झालेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ५३ व्या सभेत करण्यात आला. अध्यक्ष विश्वास पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी गडमुडशिंगी येथे पशुखाद्य कारखान्यातर्फे चारा व पशुखाद्याचे मिश्रण एकत्रित करून चारा वीट प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निश्चित केल्याचेही जाहीर केले. ताराबाई पार्कातील कार्यालयामध्ये ही सर्वसाधारण सभा झाली.
प्रास्ताविकात पाटील म्हणाले, संघाची वार्षिक उलाढाल १६३० कोटी आहे. वसूल भागभांडवल ३९ कोटी २७ लाख आहे. यंदा दूध खरेदी दरामध्ये एकवेळ दीड रुपया वाढ केली आहे तसेच दूध फरक म्हणून उत्पादकांना ४६ कोटी २ लाख दिले आहेत. ३९ कोटी ५१ लाख रक्कम डिबेंचर्स स्वरूपात संघाकडे जमा आहेत. संघाचे ५ हजार ७२ संस्थांमार्फत वार्षिक २८ कोटी ९९ लाख लिटरचे दूध संकलन केले आहे. एका दिवसाला १० लाख ७ हजार लिटर्स संकलनाचा विक्रमही केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदीमुळे बटर साठ्यामध्ये १२५ कोटी अडकले आहेत. सन २०१४-१५ वर्षासाठी ४२ गावांमध्ये ६१ बल्क कुलर्स मंजूर झाले आहेत. यापैकी सहा गावांत त्याची उभारणीही झाली आहे.
उत्पादक सभासद भविष्यकल्याण निधी योजना ‘अ’मध्ये दूध उत्पादकास प्रतिलिटर १५ आणि संस्थेस १० पैसे जमा केले जातात. संघातर्फे प्रतिलिटर १५ पैसे रक्कम या योजनेसाठी दिली जाते. ३ हजार २०७ संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत. आहार संतुलीकरण व वैरण विकास योजनेंतर्गत ‘नॅशनल डेअरी प्लॅन एक’ अंतर्गत रेशन बॅलसिंग व फॉडर डेव्हलमेंट कार्यक़्रम ३५४ गावांमध्ये ३४ हजार जनावरांसाठी राबविण्यात येत आहे. भविष्यात हा प्रकल्प ८०० गावांत राबविण्यात येईल. कर्मचाऱ्यांना २७ टक्के बोनस दिला जाईल.
यावेळी सभासद विश्वास शिंदे (कणेरी. ता. करवीर), हणमंत पाटील (निट्टूर, ता. चंदगड), श्रीपती पाटील (हसूर दुमाला, ता. करवीर), रघुनाथ पाटील (हनिमनाळ, ता. गडहिंग्लज), सुजाता जरग, सर्जेराव जरग (तुळशी, ता. करवीर), के. डी. पाटील (साजणी, ता. कागल), जि. प सदस्य हिंदुराव चौगले यांनी विविध प्रश्न विचारले.
कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर, उपमहाव्यवस्थापक (वित्त) आर. जी. पाटील यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. बोर्ड सचिव एस. एम. पाटील यांनी पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. सभेस संचालक, सभासद उपस्थित होते. संचालक रवींद्र आपटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


निवडणुकीचा
२५ लाखांवर खर्च
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी संस्थेचे २५ लाख २५ हजार ४१२ रुपये खर्च झाल्याचे नफा-तोटात नमूद केले आहे. करंट रिपेअरीवर गेल्यावर्षी १ कोटी ४ लाख ७६ हजार ७१२ खर्च झाले होते. यंदा १ कोटी १८ लाख २६ हजार ७९४ खर्च झाले आहेत. व्याज आणि बँक कमिशनवरही यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक खर्च झाल्याचे नमूद आहे.


शून्य दूध संकलन
संस्था अपात्र
गेल्यावर्षी शून्य दूध संकलन असलेल्या
३०० तर यंदा १२८ संस्थेचे संघाकडील सभासदत्व अपात्र करण्यात येईल, असे पाटील म्हणाले.

संस्थापकांचा पुतळा
संघाचे संस्थापक
आनंदराव पाटील-चुयेकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याशिवाय सन २०२० पर्यंत रोज २० हजार लिटर दूध संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

अभिनंदन करा की
संघाची चांगली कामगिरी आहे. मात्र, ‘गोकुळ’च्या दुधापेक्षा काही ठिकाणी गवळ्यांकडे दूध दर अधिक आहे. गुजरातमध्ये पशुखाद्याचे दरही ‘गोकुळ’पेक्षा कमी आहेत याचाही विचार व्हावा, असे दत्तात्रय बोळावी (सांगरूळ) या सभासदाने सुचविले. त्यावर अध्यक्ष पाटील यांनी ‘चांगले काम करत आहे त्याबद्दल अभिनंदन करा की,’ असे म्हटताच हशा पिकला.

रूटच्या प्रश्नाला बगल
गावा-गावांतील दूध संस्थेतून दूध वाहतूक करणारे टेम्पो व मुंबईला दूध नेणाऱ्या टँकरसाठी वृत्तपत्रांतून निविदा प्रसिद्ध कराव्यात, असे शामराव सूर्यवंशी (कसबा बीड) यांनी सुचविले.
यावेळी चुकीचे आरोप करू नका, निविदा काढल्या जातात, असे सांगत अध्यक्ष पाटील यांनी बगल दिली.

सत्कार : ‘गोकुळश्री म्हैस’ स्पर्धेतील विजेते राजेंद्र कोल्हापुरे (रेंदाळ, ता. हातकणंगले), पुष्पा पाटील (गुडाळ, ता. राधानगरी), काशीनाथ घुगरे (लिंगनूर कसबा नूल, ता. गडहिंग्लज) तर ‘गोकुळश्री गाय’ स्पर्धेतील विजेते प्राची पाटील (जांभळी, ता. शिरोळ), ज्ञानदेव गोधडे (मुरगूड, ता. कागल), सतीश चौगले (सांगली) यांना प्रत्येकी २० हजार, १५ हजार, १० हजार बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.
याशिवाय गुणवंत अधिकारी, कामगार, सर्वाधिक दूध विक्री करणाऱ्या केंद्रचालकांचाही सत्कार केला.

Web Title: Only the refined milk of the cow's milk will be rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.