पाचवीच्या वर्गात एकच विद्यार्थी
By Admin | Updated: June 30, 2015 00:25 IST2015-06-29T23:50:34+5:302015-06-30T00:25:18+5:30
अब्दुललाटची जि.प.ची शाळा : लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने पुन्हा वर्ग फुलला

पाचवीच्या वर्गात एकच विद्यार्थी
दगडू कांबळे - अब्दुललाट -सन २०१५चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि नेहमी भेडसावणारा विद्यार्थ्यांच्या कमतरतेचा विषय सुरू झाला. येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवीच्या वर्गात एकच विद्यार्थी हजर राहिला. बाकीचे सर्व विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल अब्दुललाट या शाळेत दाखल झाले. ही अवस्था पाहून प्राथमिक शाळेतील गुरुजींचे धाबे दणाणले.
तत्काळ त्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि खासगी शाळांचे शिक्षक, संचालक यांच्यात सुरू झाला संघर्षाचा ताकतुंबा. या दोहोतील संघर्षानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील चौथी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा बोलवण्यात आले आणि विद्यार्थ्यांविना पोरक्या झालेल्या शाळेत परत पाचवीचा पट भरल्यावर या संघर्षनाट्यावर पडदा पडला. त्यामुळे आता जबाबदारी आहे ती शाळेची गुणवत्ता वाढवायची की शाळाच बंद पाडायची याची.
१६ जूनला शैक्षणिक वर्ष सुरू झाले. काहीजण कित्ता गिरविण्यासाठी दाखल झाले, तर काहीजण पहिली ते चौथीपर्यंत कित्ता गिरवून पाचवीमध्ये प्रवेश केलेले विद्यार्थी मात्र गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले आणि ‘प्राथमिक’चा वर्ग रिकामा पडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जि. प. सदस्य दादासाहेब सांगावे, सरपंच शानाबाई कोळी, सदस्य मिलिंद कुरणे, माजी सरपंच श्रीकांत मधाळे, आदींकडून ‘त्या’ विद्यार्थ्यांना परत इकडे आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी त्यांच्या पालकांची बैठक घेतली. या बैठकीला दस्तुरखुद्द आमदारही उपस्थित राहिले. बैठकीत पालकांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू झाला. या सर्व प्रयत्नानंतर पालकांकडून एकच उत्तर मिळाले की, केंद्रीय प्राथमिक शाळेची गुणवत्ता कमी होत चालली आहे. त्यामुळे आमच्या मुलांना दुसऱ्या शाळेत घालत आहोत. यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी शाळेचा १५० वर्षांचा इतिहास पाहता ती बंद पडता कामा नये, यासाठी प्रयत्न करूया. तरी पण पालक ऐकेनात. शेवटी सर्व लोकप्रतिनिधींनी त्या पालकांना विनंती केली. यात आमदार उल्हास पाटीलही मागे राहिले नाहीत. यानंतर प्रत्येक महिन्याला शाळेची गुणवत्ता तपासली जाईल. जर यात शिक्षक कमी पडले, तर त्यांच्या बदल्या केल्या जातील, अशी हमी दिल्यानंतर पालकांना पाझर फुटला. त्यामुळे परत प्राथमिकचा पाचवीचा वर्ग फुलला.
शिक्षक, पालक यांचीही जबाबदारी
प्राथमिक शाळेची ढासळत चाललेली प्रतिमा आणि गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तेथील शिक्षकांवर अंकुश ठेऊन गुणवत्तेबाबत त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला पाहिजे आणि शाळेच्या गरजांकडे लक्ष देणे, अशी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. पालकांनीही आपल्या पाल्याविषयी जबाबदारी झटकून चालणार नाही, त्यांनीही शाळेकडे आणि आपल्या पाल्याकडे प्रगतीची खातरजमा करून घेतली पाहिजे. एवढे केले तरच मिळवले, नाही तर प्रतिवर्षी विद्यार्थ्यांची पळवापळवी होतच राहणार आहे.