घरकुलांची फक्त पायाभरणीच
By Admin | Updated: December 9, 2014 00:26 IST2014-12-09T00:03:58+5:302014-12-09T00:26:30+5:30
काम बंदच : इचलकरंजीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांची व्यथा; घर मिळण्याची आशा

घरकुलांची फक्त पायाभरणीच
इचलकरंजी : अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्धातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांच्या घरकुलांची पायाभरणी होऊन तीन महिने उलटले तरी संबंधित मक्तेदाराने बांधकामाची कोणतीही प्रगती केली नाही. त्यामुळे ‘त्या’ कुटुंबीयांचे स्वप्न साकारण्याची आशा मावळू लागली आहे.
कॉँग्रेसच्या आघाडी सरकारने दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध कुटुंबीयांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये किमतीची घरे देण्याची योजना जाहीर केली. या योजनेला रमाई आंबेडकर आवास योजना असे नाव देण्यात आले होते. या कुटुंबांना प्रत्येकी २९५ चौरस फुटाची घरकुले पूर्णपणे शासनाच्या अनुदानाने मिळणार आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात १८१ लाभार्थ्यांना घरकुले बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगरपालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव शासनाने स्वीकारला असून, त्याची पहिल्या टप्प्यातील २ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कम नगरपालिकेकडे वर्ग केली आहे. विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच ऐन धामधुमीमध्ये ७ सप्टेंबरला साईट नं. १०२ मध्ये घरकुले बांधण्याचे भूमिपूजन आणि पायाभरणी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. हा कार्यक्रम माजी खासदार निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता. मात्र, त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे त्यावेळी हा विषय राजकीयदृष्ट्या जोरदार चर्चेचा ठरला होता.
घरकुलांच्या पायाभरणीला तीन महिने उलटले तरी संबंधित मक्तेदाराने त्यावेळी पायाभरणीसाठी काढलेले खड्डे या कामाव्यतिरिक्त पुढे कोणतेही काम केलेले नाही. परिणामी, या घरकुलांकडे मात्र लाभार्थी कुटुंबीय अत्यंत आशेने डोळे लावून बसले
असून त्यांचे स्वप्न साकार होते की नाही, याची शंका उपस्थित केली जात आहे. (प्रतिनिधी)
टक्केवारीची कीड
मागासवर्गीयांमधील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांसाठी रमाई आंबेडकर आवास योजनेतून मोफत घरकुले मिळणार असल्याचे महत्त्व ओळखून कॉँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींनी हा मंजूर करून आणला, पण निविदेसाठी नगरसेवकाची टक्केवारीची कीड लागली असल्याने या घरकुलांच्या बांधकामाला दिरंगाई होत असल्याची नगरपालिका वर्तुळात चर्चा आहे.