इराणी खणीवर विसर्जनास पाच जणांनाच प्रवेश : मंडळांच्या दारात मूर्ती दान स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:55+5:302021-09-18T04:25:55+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यंदा उद्या, रविवारी सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन फक्त इराणी खणीत होणार असून तेथे ...

Only five people will be allowed to immerse themselves in the Iranian mine: Idol donations will be accepted at the doors of circles | इराणी खणीवर विसर्जनास पाच जणांनाच प्रवेश : मंडळांच्या दारात मूर्ती दान स्वीकारणार

इराणी खणीवर विसर्जनास पाच जणांनाच प्रवेश : मंडळांच्या दारात मूर्ती दान स्वीकारणार

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यंदा उद्या, रविवारी सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन फक्त इराणी खणीत होणार असून तेथे केवळ पाच कार्यकर्त्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. महानगरपालिका कर्मचारी मंडळांच्या मूर्ती मंडळाच्या दारात विसर्जन झाल्यास त्या दान स्वीकारतील आणि त्याचे विसर्जन करतील, परंतु हा पर्याय मंडळांवर बंधनकारक नसून ऐच्छिक आहे.

महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत सांगितली. शासनाने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे गणेश विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. इराणी खणीवर विसर्जनासाठी केवळ पाच कार्यकर्त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांना मूर्ती मंडळाच्या दारातच विसर्जन करून दान करायची असेल तर मूर्तीचा स्वीकार करुन महापालिकेचे कर्मचारी इराणी खणीत विसर्जित करतील, परंतु त्याची पूर्व कल्पना त्या त्या विभागीय कार्यालयाकडे देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.

वाद्ये नाहीत..

शासनाच्या नियमांचे पालन करावे, कोणीही वाद्ये आणून मिरवणूक काढू नये. महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

घरगुती गणपती विसर्जनाची व्यवस्था -

शहरात २४ ठिकाणी घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड ठेवले जाणार आहेत. ती ठिकाणे अशी - तांबट कमान, नाना पाटीलनगर, निकम पार्क, निर्माण चौक, जरगनगर कमान, क्रेशर चौक पांडुरंग हॉटेल, पतौडी खण, शाहू सैनिक तरुण मंडळ वाशीनाका, तोरस्कर चौक, गंगावेश चौक, पंचगंगा नदी घाट, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, शाहूपुरी पाण्याची टाकी, कोटीतीर्थ तलाव, राजारामपुरी रेणुका मंदिर, राजाराम तलाव, जगदाळे हॉल, टेंबलाई मंदिर, सायबर चौक, मनोरा हॉटेल पिछाडीस, सासने ग्राऊंड, नर्सरी बाग, दत्त मंदिर कसबा बावडा, शिवाजी विद्यालय जाधववाडी.

यांत्रिकी पद्धतीने होणार विसर्जन-

इराणी खणीवर येणाऱ्या मूर्तींची संख्या अधिक असल्यामुळे पारंपरिक पद्धतीबरोबर यांत्रिकी पद्धतीनेही विसर्जन केले जाणार आहे. मूर्ती लोखंडी पट्टीवर ठेवल्यानंतर गिअरच्या सहायाने मूर्ती विसर्जित होईल. एक मूर्ती विसर्जित होण्यास दोन मिनिटांचा वेळ लागणार आहे.

पॉईंटर -

- इराणी खणीवर अग्निशमन दलाची, सात वैद्यकीय पथके असणार.

- विसर्जन सुरळीत होण्यासाठी खणीवर विशेष विद्युत व्यवस्था.

- गणेश विसर्जनाकरिता पाच जेसीबी, दोन बुम, २०० कर्मचारी तैनात.

- दान मूर्ती स्वीकारण्यास ९० टेम्पोची सोय, १८० कर्मचारी नियुक्त.

- देवकर पाणंद पेट्रोल पंपाजवळून पाच कार्यकर्त्यांनाच सोडणार.

- इराण खणीवर नागरिकांना जाण्यास मज्जाव.

- विसर्जन व्यवस्था पाहण्यासाठी अधिकाऱ्यांची बारा पथके

- इराणी खणीस पूर्ण बॅरिकेड, तसेच पडदे लावणार

Web Title: Only five people will be allowed to immerse themselves in the Iranian mine: Idol donations will be accepted at the doors of circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.