वस्त्रनगरीत फक्त १४ टक्के लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:35+5:302021-06-19T04:16:35+5:30

विनायक शिंपुकडे, लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. मात्र, लस ...

Only 14% vaccination completed in the textile city | वस्त्रनगरीत फक्त १४ टक्के लसीकरण पूर्ण

वस्त्रनगरीत फक्त १४ टक्के लसीकरण पूर्ण

विनायक शिंपुकडे,

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. मात्र, लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लसीच्या तुटवड्यामुळे परत जावे लागत आहे. सध्या शहरातील ४५ वर्षांवरील ४७ टक्के नागरिकांनी पहिला, तर केवळ १४ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे लसीकरणास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊनही अद्याप वस्त्रनगरीत उद्दिष्टाच्या निम्म्याहून कमीच लसीकरण झाले आहे.

इचलकरंजी शहरात लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण केंद्रांवर लस मिळविण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लागत आहेत. नेमका किती पुरवठा होणार आहे, याबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही या गर्दीचे नियोजन लावता येईना. शहरात १८ मार्चपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला काही दिवस नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही; परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या जनजागृती आणि दुसऱ्या लाटेचा प्रभाव पाहता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला. शहरातील ४५ वर्षांवरील एक लाख ५ हजार ६३६ नागरिकांच्या लसींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, १६ जूनपर्यंत ६३ हजार ८८१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. सध्या लसीचा साठा उपलब्ध नसल्याने सध्या लसीकरण बंद ठेवण्यात आले आहेत.

चौकटी

उद्दिष्ट साध्य करण्यात अडचणी

प्रशासनाने ४५ वर्षांवरील एक लाख ५ हजार ६३६ नागरिकांना लसीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. परंतु शहरातील केंद्रास मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्यामुळे प्रशासनास आवश्यक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच लसीच्या कमी पुरवठ्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करणे शक्य होत नाही.

नागरिकांना दुसऱ्या डोसची काळजी

ज्या नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे, ते दुसरा डोस घेण्यासाठी येत आहेत. तसेच शहरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात लसीकरणाला येत आहेत. परंतु केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने त्यांची निराशा होत आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना काळजी लागून राहिली आहे.

राखीव व्यवस्था जे नागरिक किंवा विद्यार्थी परदेशात जाणार आहेत, त्यांच्यासाठी आणि दिव्यांग नागरिकांसाठी लालनगर केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Only 14% vaccination completed in the textile city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.