कोल्हापूर : घरातील व्यक्तीचे लग्न, घरातील नातेवाईकाचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठी ई-पास देण्यास पोलीस दलाकडून सुरुवात झाली आहे. त्याकरिता गरजूंना कोल्हापूर पोलीस दलाच्या http//covid19.mhpolice.in / या संकेतस्थळावर हा अर्ज ऑनलाईन भरून द्यावा लागणार आहे.हा पास केवळ अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या कारणांसाठीच पोलीस दलाच्यावतीने दिला जाणार आहे. याकरिता योग्य कारणे असलेल्या कागदपत्रांची पूर्तता अर्जदारास करावी लागणार आहे. ही कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहेत. यात कोणत्या जिल्ह्यात जाणार याचीही माहिती द्यावी लागणार आहे.
प्रवास करण्यासाठी सबळ कारण आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर टोकन आयडी अर्जदाराला मिळणार आहे. तो आयडीच पडताळणी व आवश्यक विभागाची परवानगी मिळाल्यानंतर वापरून हा ई-पास डाऊनलोड करता येणार आहे. प्रवास करतेवेळी त्याची प्रिंट आवश्यक आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही. कोणतीही व्यक्ती अथवा समूह यासाठी अर्ज करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अडचणी आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत मदत केली जाणार आहे.