शिरोळमधील कचरा संकलनावर ऑनलाईन नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:17+5:302021-09-24T04:27:17+5:30

* पालिका राबविणार उपक्रम संदीप बावचे शिरोळ : शहरातील कचरा संकलनावर ऑनलाईन नजर ठेवण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरातील ...

Online look at waste collection in Shirol | शिरोळमधील कचरा संकलनावर ऑनलाईन नजर

शिरोळमधील कचरा संकलनावर ऑनलाईन नजर

* पालिका राबविणार उपक्रम

संदीप बावचे

शिरोळ : शहरातील कचरा संकलनावर ऑनलाईन नजर ठेवण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरातील कचरा वेळच्यावेळी संकलित होतो का, यावर जीपीएस प्रणालीसह आरएफआयडीव्दारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. शिरोळ नगरपालिकेने हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर घरबसल्या पाणी कर, मालमत्ता कर किती थकीत आहे, याची माहिती उपलब्ध होणार आहे. ती ऑनलाईनद्वारे जमा करता येणार आहे. यासाठीदेखील पालिकेकडून नियोजन केले जात आहे.

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छता अभियानात शिरोळ नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून तो संकलित करण्यासाठी नियोजन केले जात आहे. खासगी ठेकेदारामार्फत कचरा संकलन होत असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. शहरात आठ प्रभाग असून घरगुती व हॉटेलसह अन्य कचऱ्याचेदेखील संकलन करण्यात येते. सध्या पालिकेकडे अपुरी घंटागाड्यांची संख्या असलीतरी कचरा संकलनासाठी पालिका प्रशासन नियोजन करते. अशा परिस्थितीत प्रभागात नियमितपणे घंटागाडी जाते का, कचरा संकलित केला जातो का, शिवाय डेपोवर कचरा वेळच्यावेळी टाकला जातो का याची माहिती पालिकेला वेळच्यावेळी मिळत नसलीतरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून आता ऑनलाईन नजर ठेवण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेत शिरोळ नगरपालिकेने देखील ठराव करून घरोघरी कचरा संकलन, आरोग्य व करवसुलीकरीता आरएफआयडी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

-------------------

घंटागाड्यांवर जीपीएस प्रणाली

कचरा संकलन करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणालीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. शिवाय मिळकतधारकांच्या घरावर कार्ड लावण्यात येणार आहे. त्यामुळे कचरा संकलनासाठी घंटागाडी आली होती का, हे सेन्सरव्दारे समजणार आहे. त्यामुळे संबंधित वाहने नेमून दिलेल्या ठिकाणी कचरा संकलित करतात का, चालकाकडून कुचराई होते का हेदेखील समजणार आहे.

चौकट - कराची माहिती ऑनलाईन

शहरातील मालमत्ता धारकांना घरबसल्या थकीत कराची माहिती मिळावी यासाठी पालिकेकडून प्रभागनिहाय माहितीचा डाटा संगणकावर अपलोड केला जाणार आहे. पाणी कर, घरपट्टी आदींची माहिती एका क्लिकवर मिळावी, यासाठी प्रकल्प राबविणार आहे. शिवाय नागरिकांना ऑनलाईन करदेखील भरता यावा यासाठी नियोजन केले जाणार आहे.

Web Title: Online look at waste collection in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.