कांद्याने यंदाही होणार ‘वांदा’
By Admin | Updated: July 4, 2014 00:48 IST2014-07-04T00:47:51+5:302014-07-04T00:48:59+5:30
गारपीट, दुष्काळाने वाढणार दर :

कांद्याने यंदाही होणार ‘वांदा’
कोल्हापूर : गारपीट व लांबलेला पाऊस, यामुळे कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कांदा हा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारच, असे सध्याचे चित्र आहे. त्यातच साठेबाजी आणि काळ्याबाजाराला वेसण घालण्यासाठी केंद्र सरकारने कांदे व बटाटे यांचा जीवनावश्यक वस्तूंत केलेला समावेश हा व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणारा असला तरी शेतकऱ्यांना याची किंमत मोजावी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांदा व बटाट्याबाबत उत्पादनावर आधारित हमीभावाबाबत कोणतीही भूमिका सरकारने स्पष्ट केलेली नाही. प्रथमच कांदा व बटाट्याला ‘एपीएमसी’ अॅक्टमधून बाजूला काढण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून बाजार समितीला थेट सूचना न आल्याने समितीही राज्य सरकारच्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. चार महिन्यांपूर्वी झालेला गारपिटीचा पाऊस व आताचा लांबलेला पाऊस, यामुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे जीवनावश्यक यादीत जरी कांदा गेला असला तरी त्यांचे भाव आगामी काळात चढेच राहतील, अशीच सध्याची स्थिती आहे. बाजारात नवी आवक मर्र्यादीतच असल्याने कांद्याचे दर वाढले आहेत.