मुलांच्या मदतीसाठी दिवसांत एक हजार क्विंटल धान्य पॉझिटिव्ह स्टोरी : ५० किटचे आज वाटप : मदतीसाठी धावले कोल्हापूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST2021-05-19T04:25:21+5:302021-05-19T04:25:21+5:30
कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुलसह जिल्ह्यातील विविध संस्थातून बाहेर पडलेल्या निराधार, निराश्रित, अनाथ मुलांच्या मदतीसाठी समाजातून मंगळवारी शेकडो हात ...

मुलांच्या मदतीसाठी दिवसांत एक हजार क्विंटल धान्य पॉझिटिव्ह स्टोरी : ५० किटचे आज वाटप : मदतीसाठी धावले कोल्हापूरकर
कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुलसह जिल्ह्यातील विविध संस्थातून बाहेर पडलेल्या निराधार, निराश्रित, अनाथ मुलांच्या मदतीसाठी समाजातून मंगळवारी शेकडो हात पुढे सरसावले. एका दिवसात तब्बल एक हजार क्विंटल धान्य जमा झाले असून त्यातील किमान ५० मुलां-मुलींना त्याचे आज बुधवारी वाटप करण्यात येणार आहे. संकुलाचे विश्वस्त व्ही. बी. पाटील व पद्मा तिवले यांच्या पुढाकाराने सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम बालकल्याण संकुलमध्ये होत आहे.
बालकल्याण संकुलसारख्या जिल्ह्यातील इतरही संस्थेतून बाहेर पडलेली सुमारे १८० हून अधिक मुले-मुली आहेत. त्यातील काही अजूनही शिकत आहेत, काही जुजबी कामे करून उदरनिर्वाह करत आहेत. लॉकडाऊनमध्ये सगळेच लॉक झाल्याने त्यांची उपासमार सुरू झाल्याचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. त्याची समाजाने दखल घेऊन भरभरून मदत जमा होऊ लागली आहे. काहीनी लॉकडाऊन होणार म्हणून घरी आणून ठेवलेले दहा-दहा किलो धान्यही आणून दिले. मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याने कांदे-बटाटे प्रत्येकी शंभर किलो आणून पोहोच केले. ज्यांनी ही मदत केली त्यातील अनेकांनी आपले नावही सांगितलेले नाही. मदतीचा झरा असा वाहता राहिला. लोकमत शहर कार्यालयाकडेही काहीनी फोन करून काय स्वरुपाची मदत हवी आहे याची चौकशी केली. आलेल्या मदतीतून संकुलातील कर्मचाऱ्यांनी धान्याचे किट केले आहे.
किट असे : गव्हाचे पीठ व तांदूळ - प्रत्येकी ५ किलो, साखर - २ किलो, तूरडाळ, मूग, कांदे, बटाटे- प्रत्येकी १ किलो. खाद्यतेल- १ लिटर
खर्चासाठी ५०० रुपये
याशिवाय मुलींना प्रत्येकी दोन सॅनिटरी पॅड दिली जाणार आहेत. महिनाभर खर्चासाठी कांही रक्कम हाताशी असावी म्हणून प्रत्येकी ५०० रुपये देण्यासाठी काही दानशूर लोक पुढे आले आहेत.
चटणी-चहापूडची गरज
आता जमा झालेल्या मदतीमध्ये मुख्यत: धान्य जास्त आहे. त्याच्यासोबतच चटणी व चहापूडही द्यायची असल्याने या स्वरूपातील मदतही आवश्यक आहे.
१८०५२०२१-कोल-बालकल्याण संकुल मदत
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्थांतून बाहेर पडलेल्या अनाथ, निराधार मुलांच्या मदतीसाठी कोल्हापूरकर मंगळवारी धावून आले. त्यातून अशी धान्यांच्या पोत्यांची थप्पीच गोळा झाली. (आदित्य वेल्हाळ)