‘शिवाजी’, ‘खंडोबा’चा एकतर्फी विजय
By Admin | Updated: January 15, 2015 00:11 IST2015-01-15T00:08:21+5:302015-01-15T00:11:53+5:30
अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धा : प्रॅक्टिस ‘ब’ वर ७-०, तर ‘साईनाथ’वर ५-० अशी मात

‘शिवाजी’, ‘खंडोबा’चा एकतर्फी विजय
कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाने प्रॅक्टिस ‘ब’चा ७-० असा, तर खंडोबा ‘अ’ने साईनाथ स्पोर्टसचा ५-० असा एकतर्फी पराभव करीत अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली. शाहू स्टेडियम येथे आज, बुधवारी दुपारच्या सत्रातील पहिला सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब ‘ब’ यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘शिवाजी’च्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. सातव्या मिनिटास ‘शिवाजी’च्या आकाश भोसलेच्या पासवर मंगेश भालकर याने पहिला गोल नोंदवीत १-० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या १५ व्या मिनिटाला ‘शिवाजी’च्या संदीप पोवार याने गोल नोंदवत २-० अशी आघाडी वाढविली. २८ व्या मिनिटास स्वत: आकाश भोसलेने गोल नोंदवत ३-० अशी आघाडी निर्माण केली. ३० व्या मिनिटास आकाश भोसलेने गोल नोंदवीत ४-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही शिवाजीच्या भक्कम बचावफळीपुढे प्रॅक्टिस क्लबचे काहीच चालले नाही. ४७ व्या मिनिटास ‘शिवाजी’च्या शिवतेज खराडे याने संदीप पोवारच्या पासवर गोल नोंदवत ५-० अशी आघाडी आपल्या संघास मिळवून दिली. ५१ व्या मिनिटाला ‘शिवाजी’च्या चिंतामणी राजवाडे याने मैदानी गोल नोंदवीत ६-० अशी आघाडी दिली. शेवटच्या काही मिनिटांत ‘शिवाजी’च्या अमृत हांडे याने गोल नोंदवीत ७-० असा एकतर्फी सामना जिंकला.
दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ ‘अ’विरुद्ध साईनाथ स्पोर्टस यांच्यात झाला. या सामन्यात प्रारंभापासून खंडोबा ‘अ’चे वर्चस्व होते. कपिल साठे, विकी सुतार, सिद्धार्थ परब, कार्तिक बागडेकर, सचिन बारामती व शकील पटेल यांनी आक्रमक व नियोजनबद्धरीत्या खेळ करीत ‘साईनाथ’वर वर्चस्व ठेवले होते. तिसऱ्या मिनिटास ‘खंडोबा’च्या सिद्धार्थ परबने गोल नोंदवीत १-० अशी आघाडी घेतली.
खंडोबाकडून ३६, ३७ आणि ३८ व्या मिनिटाला अनुक्रमे विक्रम शिंदे,कार्तिक बागडेकर, सचिन बारामती यांनी तीन गोल पटापट नोंदविले. पूर्वार्धातच खंडोबाने ४-० अशी आघाडी घेतली.
‘खंडोबा’च्या कपिल साठे याने ५४ व्या मिनिटास गोल करीत ५-० अशी आघाडी निर्माण केली. हीच आघाडी कायम ठेवत ‘खंडोबा’ने हा सामना एकतर्फी जिंकला.