एकांगी शोकांतिका-‘टू इज कंपनी’

By Admin | Updated: November 24, 2014 23:06 IST2014-11-24T22:45:39+5:302014-11-24T23:06:34+5:30

सोळाव्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये प्रा. मधुकर तोरडमल लिखित ‘काळे बेट लाल बत्ती’ सादर करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

One-sided tragedy- 'Tu is company' | एकांगी शोकांतिका-‘टू इज कंपनी’

एकांगी शोकांतिका-‘टू इज कंपनी’

जयसिंंगपूर येथील ‘नाट्यशुभांगी’ ही हौशी कलाकारांची, १९७४ पासून रंगभूमीशी निगडित असणारी संस्था. गुरूवर्य बी. एन. चौगुले यांनी शुभांगी आण्णेगिरीकर या शाळकरी बालकलाकार विद्यार्थिनीच्या स्मरणार्थ या संस्थेची स्थापना केली. ‘दिवा जळू दे सारी रात’ या नाटकाच्या प्रयोगाने ‘नाट्यशुभांगी’ने रंगमंचावर पाऊल ठेवले आणि सोळाव्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये प्रा. मधुकर तोरडमल लिखित ‘काळे बेट लाल बत्ती’ सादर करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. सुरुवातीला अनागरी विभागात आपला दबदबा तयार करणाऱ्या ‘नाट्यशुभांगी’ने नंतर नागरी विभागातील स्पर्धेमध्येही आपला ठसा उमटविला. या संस्थेकडून आजतागायत जवळपास तीस नाटके रंगमंचावर आणण्यात आली आहे. याखेरीज ८ ते १० बालनाट्ये व २५-३० एकांकिकांचे सादरीकरणही केलेले आहे. ही संस्था स्थापन करणारे बी. एन. चौगुले हे स्वत: उत्तम दिग्दर्शक, कलाकार व नेपथ्यकार तर होतेच, पण विशेषत: त्यांच्याकडून केली जाणारी प्रकाशयोजना पाहणे व समजून घेणे हा वेगळा आनंद असायचा.
यावेळी या संघाने स्पर्धेत सादर करण्यासाठी ‘टू इज कंपनी’ हे मनोज कोल्हटकर लिखित नाटक निवडले. नाटकाच्या दोन्ही अंकात मिळून अवघी दोनच पात्रे कायमपणे रंगमंचावर. दोन्ही अंकांसाठी एकच बॉक्स सेटची गरज आणि उदास, एकाकी म्हातारपणाचं मळभ असणारं वातावरण. ‘टुडे इज गिफ्ट’ सारख्या नाटकानंतर ‘टू इज कंपनी’ पाहणं म्हणजे जीवनाच्या आसक्तीकडून जीवनाविषयीच्या टोकाच्या अनिच्छेकडे असा प्रवास यावर्षी स्पर्धेत प्रेक्षकांना करावा लागला. हलक्याफुलक्या नर्मविनोदी पद्धतीनं मांडल्या जाणाऱ्या जीवनाच्या आसक्तीकडे प्रेक्षकांचा कल केव्हाही अधिक राहणार हे उघड गुपित. तरीही वर्तमानातलं कठोर वास्तव सर्वांसमोर ठेवावं म्हणून ‘टू इज कंपनी’सारखं नाटक ‘नाट्यशुभांगी’नं निवडलं असावं. हौशी नाट्यसंस्थांना वेळोवेळी आर्थिक मर्यादेसह ज्या मर्यादा जाणवतात, त्यामुळेही एकच सेट, दोनच पात्रं, त्यातही स्त्रीपात्र विरहित संहिता या गोष्टी सोयीच्या ठरतात.
नीळकंठ हर्डीकर आणि बळवंत अभ्यंकर हे दोघे बालमित्र. दोघांचंही मूळ गाव कोकणातलं राजापूर. दोघांनी एकत्र शिक्षण घेतलेलं आणि खोडकरपणाही केलेला. पुढे नीळकंठ बांधकाम साहित्य विक्रीत यश मिळवितो, तर बळवंत समीक्षक व साहित्यिक म्हणून मान्यताप्राप्त होतो. दोघांनाही मुलंबाळं असतात; पण बळवंतची मुलं परदेशी, तर नीळकंठ मुलांच्या संसारात आपली म्हातारपणी लुडबुड नको असा विचार करणारा. त्यामुळंच पत्नी वारल्यानंतर आणि बळवंत एकाकी जगतोय हे लक्षात आल्यावर नीळकंठही त्याच्या सोबत येऊन राहायचं ठरवितो. वृद्धाश्रमात जाण्याऐवजी लोणावळ्यासारख्या ठिकाणी दोघे मिळून एक फ्लॅट घेतात व ती जागा म्हणजे एक आनंदाचं बेट बनविण्याचा प्रयत्न करतात.
अर्थात असं असलं तरी बाह्यजगाशी संपर्क जवळपास नाही आणि मुलंबाळं आणि नातवंडांविषयीची ओढंही कमी होत नाही, अशा स्थितीत हे दोघे त्यावर उपाय म्हणून दररोज एक पत्र खऱ्याखोट्या गोष्टी रचून एकमेकाला लिहितात. एकत्र राहत असले तरी पत्र पोस्टात नेऊन टाकतात आणि पोस्टमननं टपाल आणून दिलं की आपल्याला टपाल आलं म्हणून आनंदित होतात. अर्थात अशा कृत्रिम पळवाटा कितीकाळ पुरणार? अखेर शरीर व्याधीनं ग्रासलेला बळवंत देहत्यागाचा निर्णय घेतो आणि आपला जीवलग मित्र गेल्यावर आपण एकटे कसे जगणार म्हणून नीळकंठ मैत्री अखंड ठेवण्यासाठी मृत्यू जवळ करण्यातही बळवंतला साथ देतो. अशा रीतीने दोघाजणांनी मृत्यू कवटाळण्यातही एकमेकांना दिलेली साथ म्हणजे ‘टू इज कंपनी’.
आजची जीवनशैली, बदलते राहणीमान, बदलत्या करिअरच्या संधी या सर्व पार्श्वभूमीवर एकाकी वृद्धावस्थेसारखे प्रश्न अधिक तीव्र होत आहेत हे वास्तव आहे; पण नव्या तीव्रता होत जाणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याचं केवळ आत्महत्या हे उत्तर असू शकत नाही. अशा अवस्थेत जगणाऱ्या वृद्धांनी आपल्यासाठी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता अनेक प्रयोग केलेले आहेत आणि आजही केले जात आहेत. अशा प्रयत्नांकडे व प्रयोगांकडे नाटककाराने साफ दुर्लक्ष केले आहे, पाठ फिरवली आहे आणि त्यामुळेच समस्या व त्यांची उत्तरे दोन्ही एकांगी राहिली आहेत.
बळवंत साकारणारे विश्वास माळी व नीळकंठ साकारणारे अजित बिडकर यांनी संपूर्ण नाटकभर जे बेअरिंग ठेवून नाटक पेलले, त्याला नक्कीच दाद द्यावी लागेल. विशेषत: विश्वास माळी यांचा अभिनय अधिक दाद देण्याजोगा होता.


५४ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा--- उदय कुलकर्णी

Web Title: One-sided tragedy- 'Tu is company'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.