५५ हजार नागरिकांमागे एक पोलीस

By Admin | Updated: November 28, 2015 00:26 IST2015-11-27T21:21:37+5:302015-11-28T00:26:05+5:30

करवीर पोलीस ठाणे : ११७ गावांची सुरक्षेची जबाबदारी केवळ ८५ पोलीस कर्मचाऱ्यांकडे

One police behind 55 thousand people | ५५ हजार नागरिकांमागे एक पोलीस

५५ हजार नागरिकांमागे एक पोलीस

प्रकाश पाटील -- कोपार्डे---वाढते औद्योगिकीकरण, नागरिकीकरण यापाठोपाठ समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. करवीर तालुका हा करवीर पोलीस ठाण्यापासून किमान ५० ते ५५ कि. मी. लांब पसरला असून, गुन्हा घडण्याअगोदर पोहोचणे सोडाच; पण गुन्हा घडल्यानंतरही पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागत आहेत. जवळजवळ १४ लाख लोकसंख्या असणाऱ्या या तालुक्यासाठी केवळ ८५ पोलीस कर्मचारी असून, किमान ५५ हजार नागरिकांचे संरक्षण एक पोलीस कर्मचारी करत आहे. करवीर तालुक्याचा निम्मा भाग हा शहर व उपनगरांत मोडतो, तर बराचसा भाग दुर्गम वाड्यावस्त्या व गाव यामध्ये मोडतो. या तालुक्याचा पूर्वेकडील भाग गांधीनगर पोलीस ठाण्यामुळे थोडा कमी झाला असला, तरी करवीर पोलीस ठाण्यावर सध्या ११७ गावांच्या सुरक्षेचा भार आहे. या पोलीस ठाण्यासाठी इस्पुर्ली, माळ्याची शिरोली, सांगरूळ या पोलीस चौक्या कार्यरत आहेत. मात्र, पोलीस कर्मचारी कमी असल्याने या पोलीस चौकींना कायमस्वरूपी पोलीस मिळत नाहीत. करवीरच्या पश्चिमेकडील भाग हा बारा वाड्या व दुर्गम भागाचा आहे. येथे वनौषधी मोठ्या प्रमाणावर आहेत. येथून मोठ्या प्रमाणावर नरक्या तस्कराची प्रकरणे उघड झाली आहेत. तर काही गुन्हे तेथे पोलीस पोहोचू शकत नसल्याने उघड होऊ शकले नाहीत.
करवीर पोलीस ठाणे व या अंतर्गत येणाऱ्या गावाचे अंतर पाहता किमान ५० ते ५५ कि. मी. अंतरावर असल्याचे दिसून येते. या पोलीस ठाण्यांतर्गत पाचगाव, फुलेवाडी यासारखी उपनगरेही येतात. तालुक्याची वाढलेली लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असून, शहराजवळ असणाऱ्या गावांतील शेतजमिनीला सोन्याचा भाव आल्याने लॅण्डमाफियांची पकड मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. यातून खून, मारामाऱ्या, धमक्या, अपहरण असे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. याशिवाय कौटुंबिक वादावादी, अपघात, दारू, जुगार यासारखे गुन्ह्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तालुक्यात मुलींच्या अपहरणाबरोबरच, मुली हरवण्याची संख्या वाढली आहे. किमान वर्षभरात दोनशे ते तीनशे मुली गायब होण्याची प्रकरणे करवीरमध्ये नोंद होताना पाहायला मिळत आहेत. या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी केवळ ८५ कर्मचाऱ्यांना अग्निदिव्य पार पाडावे लागत आहे.


तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे असले तरी गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम सुरू आहे. सर्व कर्मचारी आपल्या कामाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत. जनतेनेही गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अथवा गुन्हा रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.
- दयानंद ठोमे, पोलीस निरीक्षक, करवीर

करवीरची लोकसंख्या व वाढणारे औद्योगिकीकरण यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सांगरूळ, माळ्याची शिरोली या पोलीस चौक्या पूर्ण क्षमतेने कार्यरत होणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करू.
- राजेंद्र सूर्यवंशी,
पंचायत समिती सदस्य, करवीर

पोलीस कस्टडीची अवस्थाही वाईट
मुळात करवीर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचणे म्हणजे दिव्य आहे. आरोपीसाठी असणारी कस्टडी, कार्यालय व त्यासाठी भौतिक सुविधांचा मोठा अभाव आहे. चौकीत प्रवेश करताना समोरच मुतारी असल्याने चौकीत नाक धरून जावे लागते.

Web Title: One police behind 55 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.