‘फुलेवाडी’ची ‘शिवनेरी’वर एकतर्फी मात
By Admin | Updated: December 12, 2014 00:35 IST2014-12-12T00:23:22+5:302014-12-12T00:35:56+5:30
‘केएसए’ लीग फुटबॉल सामने : दिलबहार ‘ब’चा पाटाकडील ‘ब’वर निसटता विजय

‘फुलेवाडी’ची ‘शिवनेरी’वर एकतर्फी मात
कोल्हापूर : के. एस. ए. लीग फुटबॉल सामन्यात आज, गुरुवारी फुलेवाडी क्रीडा मंडळाने शिवनेरीचा ४-२ असा धुव्वा उडविला; तर दिलबहार ‘ब’ने पाटाकडील ‘ब’ वर १-० असा निसटता विजय मिळविला.
छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेत पहिला सामना फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून फुलेवाडीच्या राजादास, अरुणशू गुप्ता, मंगेश दिवसे, अनिकेत जाधव, रोहित मंडलिक, मोहित मंडलिक, अजित पोवार यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. दहाव्या मिनिटाला ‘शिवनेरी’च्या खेळाडूच्या हाताला बॉल लागल्याने पंचांनी फुलेवाडीला पेनल्टी बहाल केली. या पेनल्टीवर फुलेवाडीकडून राजादास याने गोल नोंदवीत १-० अशी आघाडी मिळवून दिली. १६ व्या मिनिटाला अरुणशू गुप्ता याने मैदानी गोल नोंदवीत ही आघाडी २-० केली. पुन्हा १८ व्या मिनिटाला अरुणशू गुप्ता याने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवीत आपल्या संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात शिवनेरी संघाने सामन्यात बरोबरी करण्यासाठी वेगवान चाली रचल्या. ५५ व्या मिनिटाला सूरज जाधव याने दिलेल्या पासवर इस्टिरिसो याने गोल नोंदवीत ३-१ ने आघाडी कमी केली. ५९ व्या मिनिटाला इस्टिरिसोने दिलेल्या पासवर सूरज जाधव याने गोल नोंदवीत आघाडी ३-२ अशी कमी केली. या दरम्यान शिवनेरीकडून दीपराज राऊत, सूरज जाधव यांनी खोलवर चढाया केल्या. फुलेवाडीचा गोलरक्षक निखिल खाडे याने त्या परतावून लावल्या. ६९ व्या मिनिटाला फुलेवाडीच्या सूरज शिंगटेने गोल नोंदवीत ४-२ अशी आघाडी वाढविली. अखेरपर्यंत शिवनेरीकडून वेगवान चाली रचून सामन्यात कमबॅक करण्याचे आटोकाट प्रयत्न झाले. मात्र, सजग फुलेवाडी बचावफळीकडून ते निष्प्रभ ठरविण्यात आले. हा सामना फुलेवाडीने ४-२ अशा गोलफरकाने जिंकला.
दुसरा सामना पाटाकडील ‘ब’ विरुद्ध दिलबहार ‘ब’ यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी वेगवान व आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पाटाकडील ‘ब’कडून राजेंद्र काशीद, संग्राम शिंदे, श्रीनिवास नारंगीकर, सूरज हकीम यांनी, तर दिलबहार ‘ब’कडून आदित्य माने, शशांक माने, निखिल कुलकर्णी, स्वप्निल साळोखे यांनी खोलवर चढाया केल्या. २३ व्या मिनिटाला दिलबहार ‘ब’च्या निखिल आहेर याने गोल करीत १-० अशी आपल्या संघास आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात पाटाकडील ‘ब’कडून सामना बरोबरीत आणण्यासाठी वेगवान व खोलवर चढाया केल्या. मात्र, दिलबहार ‘ब’च्या बचावफळीकडून त्या निष्प्रभ ठरविण्यात आल्या. अखेरपर्यंत सामन्यात बरोबरी साधण्यासाठी पाटाकडील ‘ब’कडून शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दिलबहार ‘ब’च्या निखिल आहेरच्या एकमेव गोलवर हा सामना जिंकला. (प्रतिनिधी)