अपघातग्रस्त वाहनांना ट्रकची धडक, एकजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:09+5:302020-12-13T04:39:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : अपघात झाल्याने रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला; तर ...

अपघातग्रस्त वाहनांना ट्रकची धडक, एकजण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : अपघात झाल्याने रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला; तर अन्य सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी तवंदी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल अमरनजीक घडली. या अपघातात संभाजी इरापा फुटाणे (वय ५०, रा. हसूरचंपू, ता. गडहिंग्लज) यांचा जागीच मृत्यू झाला
अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री १० वाजता गडहिंग्लज येथून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर घेऊन चालक अनिल बाबूराव खवणे (३०) हा कागलकडे निघाला होता. यावेळी तवंदी घाटाच्या पायथ्याशी हॉटेल अमरनजीक मंगळूरहून जयपूरकडे निघालेल्या ट्रकने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टरचालक अनिल याच्यासह ट्रकचालक गोपीलाल सैनी (रा. राजस्थान) हा जखमी झाला होता. या अपघातानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्टर व ट्रक रस्त्यावर होते.
शनिवारी दुपारी रस्ते देखभाल करणाऱ्या जयहिंद कंपनीचे कर्मचारी ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला घेत होते. याच वेळी मुंबईकडे निघालेल्या नारळ वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यावेळी या ठिकाणी उभे असलेले संभाजी इराप्पा फुटाणे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला; तर या ट्रकने वाहने बाजूला करीत असलेल्या जयहिंद कंपनीचे कर्मचारी नेताजी दिनकर यादव (५०) रा. बानगे (ता. कागल) यांच्यासह भीमा सोमा डुंडगे (३५) व अक्षय लक्ष्मण बस्ती (२५, दोघेही रा. हसूरचंपू) या तिघांसह अन्य तिघांना ट्रकने धडक दिली. या विचित्र अपघातात एकूण सहाजण जखमी झाले आहेत. घटनेची नोंद निपाणी पोलिसांत झाली असून अधिक तपास सुरू आहे.
फोटो ओळ : निपाणी येथे तवंदी घाटाच्या पायथ्याशी अपघातग्रस्त झालेल्या वाहनांना ट्रकने जोराची धडक दिली.