खिंडी व्हरवडेनजीक कारला अपघात, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:23+5:302021-07-14T04:29:23+5:30

कोल्हापूर- राधानगरी रस्त्यावर खिंडी व्हरवडे ते आणाजे गावांदरम्यान ओढ्यानजीक कोल्हापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इंडिका कारवरील चालकाचा ...

One killed in car accident near Khindi Verwad | खिंडी व्हरवडेनजीक कारला अपघात, एक ठार

खिंडी व्हरवडेनजीक कारला अपघात, एक ठार

कोल्हापूर- राधानगरी रस्त्यावर खिंडी व्हरवडे ते आणाजे गावांदरम्यान ओढ्यानजीक कोल्हापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इंडिका कारवरील चालकाचा ताबा सुटून रस्त्याकडेला झाडावर कार आदळल्याने चालक एकनाथ गुंडू पाटील (वय ५६ रा. बटकणंगले, ता. गडहिंग्लज) यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात कारमधील दोन महिला व दोन पुरुष गंभीर जखमी असून, त्यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची दुर्घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचदरम्यान घडली. अपघाताची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.

अधिक माहिती अशी की, मृत एकनाथ पाटील हे सोमवारी कामानिमित्त इंडिका कारने (एमएच ०९ बीबी ३००७) राधानगरीला आले होते. यावेळी त्यांच्यासोबत अन्य चौघे जण होते. काम आटोपल्यानंतर ते सर्व जण सायंकाळी कोल्हापूरकडे निघाले. खिंडी व्हरवडे-आणाजेदरम्यान भरधाव कार आली असता चालक एकनाथ पाटील यांचा कारवरील ताबा सुटून कार विरुद्ध दिशेने झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एकनाथ पाटील यांचा गंभीर अवस्थेत जागीच मृत्यू झाला. अपघातातील पोलीस पाटील राजाराम पोवार, महेश खांडेकर आणाजे येथील माजी सरपंच छाया पाटील यांना खासगी रुग्णालयात पाठविले. एकनाथ पाटील हे कोल्हापुरात उद्योग भवनमध्ये औद्योगिक विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. पुढील तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे हवालदार बजरंग पाटील करीत आहेत.

Web Title: One killed in car accident near Khindi Verwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.