आंबोलीत अपघातात एक ठार
By Admin | Updated: July 1, 2015 00:21 IST2015-07-01T00:21:42+5:302015-07-01T00:21:42+5:30
सात जखमी : अपघातग्रस्त कर्नाटकातील; दोन कारमध्ये धडक

आंबोलीत अपघातात एक ठार
आंबोली : आंबोली-मुळवंदवाडी येथे ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला, तर अन्य सातजण गंभीर जखमी झाले. मृत युवकाचे नाव अशोककुमार चंद्रशेखर हिंदमणी (रा. लोकापूर-बागलकोट) असे आहे. सर्व जखमींना उपचारासाठी बेळगाव तसेच सावंतवाडी येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी घडला.
आंबोली-मुळवंदवाडी येथे ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात सावंतवाडीकडे येणाऱ्या कारला बेळगावकडे जाणाऱ्या आयकॉन कारची समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला, तर सात ते आठ युवक बसलेली आयकॉन कार रस्त्यापासून काही अंतरावर फेकली गेली.
अपघातानंतर यामधील अशोककुमार चंद्रशेखर हिंदमणी हा आयकॉन कारमधील युवक जागीच ठार झाला, तर शभू बजंत्री (वय ३९), ईश्वर लमाणी (२९), अरुण (पूर्ण नाव समजू शकले नाही. वय २८, सर्व रा. लोकापूर-बागलकोट) या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींच्या डोक्याला तसेच चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे. जखमींवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथे हलवण्यात आले आहे. तर इंडिका कारमधील महम्मद अलिफ नाईफ (वय २७), महम्मद नाईक (२६), अभिषेक पाटील (२४), प्रसन्ना दर्गागोडा (२७), वैभव मान्नूर (२९), गिरीष हुबळी (३२, सर्व रा. आरपीडी बेळगाव) यांना आंबोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील जखमींना बाहेर काढताना पोलिसांची व ग्रामस्थांची चांगलीच दमछाक झाली होती. जखमींना बाहेर काढल्यानंतर बराच वेळ जखमींची ओळख पटत नव्हती. आयकॉन कारमधील जखमींना मराठी येत नसल्याने उशिरापर्यंत त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क होत नव्हता. अखेर सावंतवाडीत या सर्व जखमींना आणल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आली. अपघाताचा तपास आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल मंगेश शिंगाडे, नीलेश उम्रजकर करीत आहेत. (वार्ताहर)
१०८ रुग्णवाहिका तातडीने दाखल
अपघाताची माहिती आंबोलीतून १०८ रुग्णवाहिकेला देण्यात आली. मात्र, सावंतवाडीतील रुग्णवाहिका गोवा येथे रुग्ण घेऊन गेल्याने कुडाळ, दोडामार्ग, आजरा तसेच वेंगुर्ले येथील १०८ रुग्णवाहिका आंबोली व सावंतवाडीत तातडीने दाखल झाल्याने जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. त्यामुळे जखमींचे प्राणही वाचल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.