शंभरावर एकरावर एकाच अधिकाऱ्याचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:47+5:302021-09-08T04:31:47+5:30

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरावरील १०० एकरांपेक्षा जास्त जमीन शहरातील ‘समाजाचे कल्याण’ करणाऱ्या कार्यालयातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने ...

One hundred officers on a hundred acres | शंभरावर एकरावर एकाच अधिकाऱ्याचा डल्ला

शंभरावर एकरावर एकाच अधिकाऱ्याचा डल्ला

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरावरील १०० एकरांपेक्षा जास्त जमीन शहरातील ‘समाजाचे कल्याण’ करणाऱ्या कार्यालयातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने कवडीमोल दराने खरेदी केल्याची माहिती पुढे येत आहे. वर्दीच्या जोरावर त्या आता डोंगर पोखरून भूखंड तयार करून लाखो रुपयांना विक्री करीत आहेत. अशा प्रकारे कोल्हापूर शहरातील अनेक दोन नंबरवाल्यांनी डोंगरावर डल्ला मारला आहे. त्याची माहिती मिळताच डोंगरालगतच्या १२ गावांतील ग्रामस्थांमधील असंतोष ऐरणीवर आला आहे.

कोल्हापूर शहरापासून एका तासाच्या अंतरावर असल्याने वाघजाई डोंगरावरील जमिनीवर व्हॉइट कॉलर म्हणून शहरात वावरणारे आणि दोन नंबरवाल्यांनी पैसे गुंतवले आहेत. आता तेथील जमिनीचे भाव वाढत असल्याने ते ताबा घेऊन भूखंड पाडून विकण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण प्रत्यक्ष ताबा नसल्याने वर्षानुवर्षे कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. असाच विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना १०० एकरावर जमीन खरेदी केलेल्या त्या महिला पोलीस अधिकाऱ्याने मरळी येथील शेतकऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वाघजाईसह शाहूवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या आहेत. यामुळे समाजाचे कल्याण करणाऱ्या कार्यालयात अनेक वर्षे तळ ठोकून आपल्यासह पुढच्या दहा पिढ्यांचे कल्याण करून घेतल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे काळा पैसा गुंतवण्यासाठी डोंगरात जमीन घेऊन सपाटीकरणाच्या नावाखाली पोखरण्यात येत असल्याने अति पाऊस झाल्यानंतर लगतची गावे डोंगर कोसळून जमिनीत गाडण्याचा धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

चौकट

पन्हाळा तहसीलमध्ये

मेहरनजर

वाघजाई डोंगरातील जमिनी नाममात्र दराने विकण्यास मदत केल्याने पन्हाळा तहसीलमधील अनेक जण मालामाल झाल्याचा आरोप होत आहे. वरकमाईचा वाटा साहेबांपर्यंत जात असल्याने साहेब डोंगराच्या जमिनीचा विषय काढताच मौन पाळत आहेत. त्यांच्या मौनात अर्थकारण दडले आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मूळ ग्रामस्थ बेदखल

अन् पैसेवाल्यांना सलाम

वाघजाई डोंगरातील जमीन खरेदी- विक्रीमध्ये तहसील कार्यालयात मूळ ग्रामस्थांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जाते, अशा तक्रारी आहेत. डोंंगरात जमीन घेतलेल्या पैसेवाल्यांना सलाम आणि मूळ भूमिपुत्र बेदखल, असा अनुभव येत असल्याचे वाघजाईचे ग्रामस्थ सांगतात. कोरोनाचे कारण सांगून आमच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत; पण जमीन घेतलेल्यांना मदत केली जात असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: One hundred officers on a hundred acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.