हारगेच्या आणखी एका साथीदारास अटक
By Admin | Updated: December 7, 2014 00:56 IST2014-12-07T00:37:30+5:302014-12-07T00:56:32+5:30
पोलीस कोठडी : जातीचे खोटे प्रमाणपत्रप्रकरण

हारगेच्या आणखी एका साथीदारास अटक
कोल्हापूर : जातीचे बनावट वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील बाळासाहेब ऊर्फ प्रशांत महादेव हारगे (वय ३२, रा. सलगरे, ता. मिरज) त्याचा साथीदार संशयित समीर बाबासो जमादार (वय २९ रा. मल्लेवाडी, ता. मिरज) याला आज शनिवारी अटक केली. जमादार याच्या घरातून जात वैधता प्रमाणपत्र तयार करणारे साहित्य जप्त केले. न्यायालयाने दोघांना बुधवार (दि.१०) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, संशयित हारगे हा मिरज तालुका भाजप अल्पसंख्याक विभागाचा उपाध्यक्ष व युवा मोर्चाचा सदस्य आहे. त्याचे व्हिजिटिंग कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबत पोलीसानी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील कृष्णात आनंदा संकपाळ (वय ३२, रा. सुरुल, ता. पाटण) या शिक्षकाला त्याने कुणबी जातीचे वैधता प्रमाणपत्र देतो असे सांगितले. त्यानुसार कोल्हापुरात काल, शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात विभागीय जात पडताळणी समिती कार्यालय क्रमांक दोनचे अधिकारी व शाहूपुरी पोलिसांनी एका हॉटेलसमोर पकडले.
त्यानंतर पोलीसांनी तपास करून हारगेचा साथीदार समीर जमादारला अटक केली.त्याच्या घरातील स्कॅनर, प्रिंटर, व कागदे जप्त केली. संशयिताने यापूर्वी कितीजणांना अशा प्रकारची किती जातीची बनावट वैधता प्रमाणपत्र दिली आहेत, तसेच यापूर्वी पाटण पंचायत समिती निवडणुकीवेळी एका उमेदवाराला अशा प्रकारचा खोटा दाखला मिळाला होता.
या दृष्टिकोनातून पोलीस तपास करण्याची शक्यता आहे. दरम्यान,जातीच्या प्रमाणपत्रासाठी वापरण्यात आलेला कागद हा शासकीय नसून, संशयित हारगेचा विभागीय जात पडताळणी समिती कार्यालय क्रमांक दोनशी काही संबंध नसल्याचे समितीने सांगितले. (प्रतिनिधी)