आजरा तालुक्यात ५० गावांत एक गाव एक गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:20+5:302021-09-11T04:24:20+5:30
आजरा शहरात सकाळी कुंभार गल्लीत घरगुती गणपती घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यातच पावसाने उसंत दिल्याने नागरिकांच्या ...

आजरा तालुक्यात ५० गावांत एक गाव एक गणपती
आजरा शहरात सकाळी कुंभार गल्लीत घरगुती गणपती घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यातच पावसाने उसंत दिल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गणपती बाप्पा मोरयाचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून सोडला होता. सकाळच्या सत्रात घरगुती गणपतींचे आगमन जल्लोषात करण्यात आले. दुपारनंतर तालुक्यातील सार्वजनिक गणपतीचे आगमन पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाले. तालुक्यात सर्वत्र कोरोनाचे नियम पाळून व पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपतीचे आगमन करण्यात आले. अनेक मंडळांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गणपतीचे आगमन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने व शांततेत गणेशोत्सव साजरा करावा. आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी केले आहे.
तालुक्यातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपली नावे मतदारयादीत नोंद करावीत. १ नोव्हेंबरपासून मतदार जनजागृती अभियान सुरू होत आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा व सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांची नावे मतदार यादीत नोंद करावीत, असे आवाहन तहसीलदार विकास अहिर व निवडणूक नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांनी केले आहे.