पंचवीस लाखांच्या बदल्यात जुने एक कोटी
By Admin | Updated: July 16, 2017 01:02 IST2017-07-16T01:02:21+5:302017-07-16T01:02:21+5:30
आयकर विभागाचे सहायक संचालक विजय नेटके आणि आयकर अधिकारी प्रकाश मोहिते हे या जुन्या नोटांची चौकशी करीत आहेत.

पंचवीस लाखांच्या बदल्यात जुने एक कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोली : शिरोली-सांगली फाटा येथे सापडलेल्या जुन्या नोटांचा सौदा एक कोटी जुन्या नोटांच्या बदल्यात पंचवीस लाखांच्या नवीन नोटा असा सौदा ठरल्याचे तपासात पुढे आले आहे. करवीरचे पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गुरव म्हणाले, जुन्या नोटांची देवघेव होणार असल्याची माहिती पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिरोली पोलिसांनी सापळा रचला होता. परेल, मुंबई येथील किशोर गांधी यांचे स्नेही कोल्हापूरमध्ये आहेत. या संबंधित स्नेहीने गांधीनगरच्या कलमेश दुंबानी याला गाठून गांधी याच्याशी बोलणे करून दिले होते. पंधरा दिवसांपासून गांधी आणि दुंबानी यांचा सौदा ठरविण्याबाबत फोनवरून बातचित सुरू होती. एक कोटीला पंचवीस लाख देण्याचे ठरल्यावर गांधी हा जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता गांधी हा सांगली फाटा येथे आला. गांधी हा शिरोली-सांगली फाटा येथे पाठीला जुन्या नोटांची काळी बॅग अडकवून संशयितरीत्या फिरत होता. काही वेळाने दुंबानी हा तेथे आला. दोघांचा पैसे बदलून घेण्यासाठी व्यवहार सुरू असताना पोलिसांनी या दोघांना पकडले. त्यांच्याकडून जुन्या चलनातून बाद झालेले सुमारे एक कोटी रुपये जप्त केले. आयकर विभागाचे सहायक संचालक विजय नेटके आणि आयकर अधिकारी प्रकाश मोहिते हे या जुन्या नोटांची चौकशी करीत आहेत. पत्रकार परिषदेला शिरोलीचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, वसंत पिंगळे, दिगंबर रसाळ, अविनाश पोवार उपस्थित होते.