राज्यातील एक लाख पाच हजार घरेलू कामगारांना दीड हजार अर्थसाहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST2021-05-05T04:38:26+5:302021-05-05T04:38:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या राज्यातील एक लाख पाच हजार ...

राज्यातील एक लाख पाच हजार घरेलू कामगारांना दीड हजार अर्थसाहाय्य
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या राज्यातील एक लाख पाच हजार ५०० घरेलू कामगारांसाठी प्रत्येकी दीड हजार रुपये अर्थसाहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी १५ कोटी ८२ लाख रुपयांच्या निधी वितरणास मान्यता दिल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली.
कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 'ब्रेक द चेन'अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील घरेलू कामगार आणि बांधकाम कामगारांना आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या कामगारांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) द्वारे निधी वितरित करण्याची कार्यवाही विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्या स्तरावरून लवकरच करण्यात येत आहे.
अकरा लाख बांधकाम कामगारांनाही अर्थसाहाय्य
राज्यातील नोंदीत सक्रिय १३ लाख बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य थेट त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. १३ लाख बांधकाम कामगारांपैकी आतापर्यंत ११ लाख १० हजार ९२९ नोंदीत बांधकाम कामगारांना १६६ कोटी ६४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.