दीड लाखाचा गुटखा, तंबाखू जप्त
By Admin | Updated: July 1, 2016 00:34 IST2016-07-01T00:25:32+5:302016-07-01T00:34:13+5:30
इचलकरंजीत कारवाई : एकास अटक; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

दीड लाखाचा गुटखा, तंबाखू जप्त
इचलकरंजी : अवैध गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या चालकास टेम्पोसह येथील गावभाग पोलिस ठाण्याच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री पकडले. या कारवाईत टेम्पोसह चार लाख ५८ हजार रुपयांचा तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी श्रीशैल सदाशिव वाळवेकर (वय २२, रा. खंजिरे मळा) याला अटक केली आहे. अन्न व औषध विभागाच्यावतीने पंचनामा करून गावभाग पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बुधवारी रात्रीच्या सुमारास येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर श्रीशैल वाळवेकर याला टेम्पोमधून जात असताना गावभाग पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाने संशयावरून थांबविले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता गाडीमध्ये पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांना यासंदर्भात माहिती दिली.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने अन्नसुरक्षा अधिकारी ए. बी. कोळी व ए. जे. टोणपे या दोघांनी गुरुवारी गावभाग पोलिस ठाण्यात येऊन जप्त केलेल्या मालाची तपासणी केली. त्यामध्ये गाडीत एक लाख ५८ हजार रुपयांचा विविध कंपन्यांचा पानमसाला व गुटखा असा मुद्देमाल आढळला. (वार्ताहर)
अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळच नाही
शासनाने प्रतिबंध केला असला तरी गल्लोगल्ली गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू असते. गुटखा खाणाऱ्यांना सहजपणे तो उपलब्ध होतो. यावर नियंत्रण ठेवणे अथवा कारवाई करणे अन्न व औषध प्रशासनाला शक्य नाही. कारण तालुक्याला इन्स्पेक्टरची आवश्यकता असताना सध्या जिल्ह्यासाठी आठ इन्स्पेक्टर आहेत. मात्र, त्यातील चारच कार्यरत आहेत. या चार व्यक्तींमार्फत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे.
वेळकाढू प्रक्रिया
पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडून अन्न व औषध प्रशासन विभागाकडे वर्ग केला असला तरी हा गुटखा शासनाने प्रतिबंध केलेल्या नियमानुसार प्रतिबंधित आहे का? याबाबत तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठविला जातो. तेथून कमीत कमी सहा महिने ते जास्तीत जास्त दोन वर्षांच्या कालावधीनंतर त्याचा अहवाल प्राप्त होतो, अशी वेळकाढूपणाची शासकीय प्रक्रिया असल्याने आरोपी सुटून जातात.