नवोदय विद्यालयाच्या ओंकार साठे-पाटील, नेहा पाटील यांना राष्ट्रीय बालश्री पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:07 IST2021-02-20T05:07:07+5:302021-02-20T05:07:07+5:30
कोल्हापूर : कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या ओंकार साठे-पाटील आणि नेहा पाटील या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बाल श्री पुरस्कार पटकाविला ...

नवोदय विद्यालयाच्या ओंकार साठे-पाटील, नेहा पाटील यांना राष्ट्रीय बालश्री पुरस्कार
कोल्हापूर : कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या ओंकार साठे-पाटील आणि नेहा पाटील या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बाल श्री पुरस्कार पटकाविला आहे. त्यांच्या माध्यमातून या पुरस्काराचा बहुमान पहिल्यांदाच या विद्यालयाला मिळाला आहे.
नवी दिल्लीतील राष्ट्रीय बालभवनमधील स्पर्धेत विद्यालयाचे सात विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील ओंकार याने क्रिएटिव्ह सायन्स इनोव्हेशन आणि प्रॉब्लेम सोलविंग या विषयामध्ये, तर नेहा हिने क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये हिंदी कथालेखन स्पर्धेत धवल यश मिळविले. हे दोन्ही विद्यार्थी ग्रामीण भागातील असून ते स्पर्धेत दिव्यांग श्रेणीत होते. या दोघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या बचतीचे पोस्टाचे पासबुक, बाल श्री चषक, प्रमाणपत्र आणि काही पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच्या वितरणाचा कार्यक्रम विद्यालयामध्ये बुधवारी झाला.
यावेळी विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रताप माने, कागलचे उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, गरवारे बालभवन औरंगाबादचे संचालक सुनील सुतावणे, कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, विद्यालयाचे प्राचार्य के. श्रीनिवासराव प्रमुख उपस्थित होते.
बाल श्री प्रभारी अशोक लिमये यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य ऐनसी जॉर्ज यांनी आभार मानले.
चौकट
प्रेरणादायी कामगिरी
दिव्यांग असूनही ओंकार आणि नेहा यांनी केलेली कामगिरी मोठी आणि कौतुकास्पद आहे. त्यांची कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी असल्याचे प्रताप माने आणि सुनील सुतावणे यांनी सांगितले.
फोटो (१८०२२०२१-कोल-जवाहर विद्यालय) :
कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या ओंकार साठे-पाटील आणि नेहा पाटील या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बाल श्री पुरस्कार पटकाविला. त्याचे वितरण बुधवारी विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रताप माने, कागलचे उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, गरवारे बालभवन औरंगाबादचे संचालक सुनील सुतावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी के. श्रीनिवासराव आदी उपस्थित होते.