जुने प्रतिस्पर्धी की नवा पर्याय!

By Admin | Updated: October 20, 2015 00:19 IST2015-10-20T00:04:39+5:302015-10-20T00:19:17+5:30

मतदारांचा कौल कुणाला : सावंत, टिपुगडे, मोहिते यांच्यात चुरस

Older competitive options! | जुने प्रतिस्पर्धी की नवा पर्याय!

जुने प्रतिस्पर्धी की नवा पर्याय!

कोल्हापूर : संभाजीनगर बसस्थानक प्रभागात शिवसेनेचे दत्ताजी टिपुगडे, राष्ट्रवादीचे महेश सावंत आणि भाजपच्या यशोदा मोहिते यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे. सावंत, टिपुगडे हे जुनेच प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, यावेळी प्रथमच प्रभागाबाहेरील मोहिते यांनी दोघांपुढे आव्हान निर्माण केले आहे. मतदार जुन्या प्रतिस्पर्ध्यांपैकी कोणाला पुन्हा संधी देणार की मोहिते यांचा पर्याय स्वीकारणार हे पाहावे लागेल.
उच्चशिक्षित, नोकरदार, श्रमिक, कष्टकरी अशी संमिश्र लोकवस्ती असलेल्या प्रभागात शेवटच्या टप्प्यात जो उमेदवार हात सैल सोडेल, त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. मुळात गेल्या काही वर्षांपासून महेश सावंत व दत्ताजी टिपुगडे या प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरत आले आहेत. ‘मी नाही तर माझी पत्नी’ असा त्यांचा अट्टाहास कायम राहिला आहे. गेल्या निवडणुकीत ‘सर्वसाधारण महिला’ असे आरक्षण पडले, त्यावेळी टिपुगडे व सावंत यांनी त्यांच्या पत्नींना निवडणूक लढविण्यास भाग पाडले. आता सर्वसाधारण आरक्षण असल्याने दोघांनी पुन्हा विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.
महेश सावंत यांच्या पत्नीचा पराभव झाल्यानंतर ते कधीही या प्रभागात फिरकले नाहीत. मतदारांशीच नाही तर कार्यकर्त्यांशीही संपर्क ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलही नाराजी दिसते. काँग्रेसकडे मालोजीराजे समर्थक समीर घोरपडे यांनी उमेदवारी मागितली होती; पण त्यांना न देता अमर नंदकुमार जरग या नवख्या उमेदवारास पक्षाने उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या यशोदा मोहिते या प्रभागातील रहिवासी नाहीत; परंतु प्रभागात त्यांचा व त्यांचे पती प्रकाश मोहिते यांचा संपर्क आहे; परंतु जिंकून येण्याएवढा हा जनसंपर्क नक्कीच उपयोगी पडणार नाही. त्यांच्यामागे राज्यातील सत्ताधारी पक्षाची ताकद उभी राहणार आहे. याशिवाय अमर जरग (कॉँग्रेस), प्रताप पाटील (अपक्ष), प्रशांत पिसे (अपक्ष) व अजित सूर्यवंशी हेही रिंगणात आहेत. ( प्रतिनिधी )


मतभेद : फटका कोणाला...
शिवसेनेतील मतभेदाचा फटका दत्ताजी टिपुगडेंना बसतो का हे पाहावे लागणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील राजकीय वाद संपल्याचे सांगितले जाते; पण मतदानयंत्रे खोलल्यावरच त्याची खात्री पटणार आहे. दुसरे म्हणजे टिपुगडे यांनी कामे करण्याचा प्रयत्न केला असला तरी ती सगळीच पूर्ण झालेली नाहीत. जुना वाशी नाका, राजाराम चौक ते टिंबर मार्केट कमान हा रस्ता गेल्या चार वर्षांपासून रखडला आहे. काही भागांत पाण्याचा प्रश्नही मिटला नाही. त्याबद्दल काहीशी नाराजी आहे.

Web Title: Older competitive options!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.