जुना बुधवारात दोन गटांत धुमश्चक्री
By Admin | Updated: October 12, 2014 01:06 IST2014-10-12T01:04:00+5:302014-10-12T01:06:43+5:30
दहाजणांना अटक : महिलेसह नगरसेवक गंभीर जखमी

जुना बुधवारात दोन गटांत धुमश्चक्री
कोल्हापूर : सोन्यामारुती चौक येथील नीलेश हॉटेलमध्ये जेवणाची ताटे उशिरा दिल्याच्या कारणावरून दोन गटांतील वादावादीचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये स्वीकृत नगरसेवक शशिकांत धोंडिराम पाटील (वय ४०, रा. सोन्यामारुती चौक, जुना बुधवार पेठ), त्यांची भावजय सुनंदा पाटील व दुसऱ्या गटातील प्रवीण सुतार हे गंभीर जखमी झाले. हल्ल्यामध्ये दगड, काठ्या व तलवारी यांचा वापर करण्यात आला. या धुमश्चक्रीमुळे परिसरात गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून दोन्ही गटांचे कार्यकर्ते पसार झाले. ही हाणामारी निवडणुकीच्या वादातून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले, नगरसेवक शशिकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये, नीलेश हॉटेलमध्ये आपल्या घरातील मुले जेवणासाठी गेली असताना तेथे आॅर्डर दिलेली जेवणाची ताटे लवकर दिली नाहीत म्हणून हॉटेलमालक सुहास भालकर यांच्याशी किरकोळ वाद झाला. हा वाद मिटवून घरी गेल्यानंतर हॉटेलमालक भालकर यांच्या बाजूने भगतसिंग तरुण मंडळाचे उदय भोसले, करण भोसले, अभिमन्यू भोसले, रोहित पाटील (आप्पा), विजय खोत, प्रवीण सुतार, मकरंद ऊर्फ पिंटू स्वामी अशा २० ते २५ जणांनी घरात घुसून मारहाण केली.
यामध्ये माझ्यासह भावजय सुनंदा पाटील जखमी झाल्या; तर विरोधी गटाच्या अभिमन्यू उदय भोसले (२१, रा. सी वॉर्ड, जुना बुधवार पेठ) याने दिलेल्या फिर्यादीमध्ये बापू फें्रडस सर्कल या ठिकाणी भांडण मिटविण्यासाठी वडील उदय, भाऊ करण भोसले, मित्र विजय खोत, प्रतीक शिर्के, रोहित पाटील, पिंटू स्वामी, प्रवीण सुतार, विकी सुतार उभे असताना शशिकांत धोंडिराम पाटील, महेश चंद्रकांत पाटील, अमित शिवाजी दुधगावकर, सागर नारायण पाटील, हरीश शिवाजी दुधगावकर, प्रथमेश चंद्रकांत जाधव, युवराज चंद्रकांत दाभाडे, अशा २० ते २५ जणांनी एकत्र जमून दगडफेक करून प्रवीण सुतार याच्यावर सूर्यकांत पाटील याने तलवारीने हल्ला केल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले. त्यानंतर रात्री उशिरा फिर्यादी दाखल करून संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.