उदगावातील पुरातन मंदिर अद्याप गायबच
By Admin | Updated: July 18, 2015 00:18 IST2015-07-17T22:03:50+5:302015-07-18T00:18:46+5:30
देवस्थान समितीचे दुर्लक्ष : शिवसागर मंदिराचा शोध घेणे गरजेचे

उदगावातील पुरातन मंदिर अद्याप गायबच
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील पुरातन शिवसागर मंदिराचे गूढ कायम असून, याकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सुद्धा नाममात्र लक्ष दिले आहे. पुरातन मंदिरे जतन करण्याची सक्त गरज असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.उदगाव येथील पुरातन रामलिंग मंदिर, गावातील हनुमान, कृष्णाकाठावरील श्रीपाद स्वामी मंदिर व शिवसागर मंदिर ही मंदिरे शाहू महाराज संस्थान काळातील आहेत. सध्या धर्मालय आयुक्त व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या सरकारी विभागाकडे नोंद असून, सध्या उदगाव ग्रामपंचायतीकडे या जमिनी आहेत. येथील शिवसागर मंदिराच्या नावे पाच एकर जमीन असून, ही जमीन १९५९ पासून आजतायत शेतकऱ्यांकडे आहेत. मात्र, गावात पुरातन शिवसागर मंदिर हे कोठे आहे, याबाबत गूढ कायम आहे.
उदगाव येथे १४ मे रोजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने उदगाव येथे बैठक घेतली. या बैठकीमध्ये गावपातळीवर १५ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीने शोधमोहीम राबविली. मात्र, अद्याप त्यांना मंदिर सापडले नाही. शिवसागर मंदिराची सर्व खात्यांकडे नोंद असून देखील मंदिर कोठे आहे, याची माहिती मिळाली नाही. पश्चिम महाराष्ट्र समितीचे सहायक सचिव प्रमोद पाटील, मिलिंद घेवारे यांनी याची दखल घेतली होती. मात्र, अजून कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. मंदिराची शेती सुद्धा जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उदगावमध्ये पुरातन मंदिरांची दखल घेऊन शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
उदगाव येथील पुरातन शिवसागर मंदिर हे गायब असून, याकडे शासनाने लक्ष्य देऊन, शोध मोहीम राबवून पुरातन मंदिरे जतन करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच या मंदिराकडे असलेल्या शेतजमिनी जाण्याच्या मार्गावर आहेत. तरी या खात्याने लवकरात लवकर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-शीतल आंबी, स्थानिक पुरातन देवस्थान समिती सचिव.