वृद्ध फिरस्त्याचा खून पैशांसाठीच
By Admin | Updated: January 10, 2016 01:10 IST2016-01-10T01:10:45+5:302016-01-10T01:10:45+5:30
संशयित फिरस्त्याला अटक : अन्य दोघे साथीदार फरार

वृद्ध फिरस्त्याचा खून पैशांसाठीच
कोल्हापूर : शिवाजी पेठ निवृत्ती चौक परिसरातील वृद्ध फिरस्त्याच्या खूनप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिताफीने संशयित फिरस्त्यास शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले.
हसन गौस मुल्लाणी (वय २९, रा. सदर बाजार) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने रस्त्यावर फूटपाथवर झोपलेल्या फिरस्त्यांकडून आपण जबरदस्तीने पैसे काढून घेत असतो. नारायण रावबा देसाई (७२ रा. मूळ गाव खोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याकडेही पैसे होते. ते काढून घेण्याचा प्रयत्न करीत असताना तो विरोध करायचा. त्यामुळे त्याला संपवूनच पैसे काढायचे, असा प्लॅन केला. गुरुवारी पहाटे मुबारक व आणखी एका मित्राच्या मदतीने रिव्हॉल्व्हरमधून गोळी घालून त्याच्याजवळील पैसे काढून घेत पलायन केले, अशी कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार त्याच्या साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, संशयित मुल्लाणी याने रिव्हॉल्व्हर कुठे लपविले आहे, याची माहिती पोलिसांना अद्याप दिलेली नाही. तो फिरस्ता असताना त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर आले कुठून, ते कोणी दिले. त्याचे अन्य दोन साथीदार मिळाल्यानंतर या खुनाचा पूर्णत: उलगडा होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी अद्याप या डिटेक्शनची माहिती रेकॉर्डवर आणलेली नाही. संशयित हसनला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला मध्यरात्री उशिरा घटनास्थळी फिरवून माहिती घेतल्याचे समजते.
बाबूजमाल तालीम-निवृत्ती चौक रस्त्यावर गुरुवारी (दि. ७) नारायण देसाई हे मृतावस्थेत जुना राजवाडा पोलिसांना मिळाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. सीपीआरच्या शवविच्छेदनामध्ये त्यांच्या डोक्यातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याने मृत्यू झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांचा खून कोणत्या कारणासाठी आणि कोणी केला, हे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले. चारही पोलीस ठाण्यांची पथके स्वतंत्रपणे या खुनाचा तपास करत होती. देसाई यांच्या नातेवाइकांकडेही पोलिसांनी चौकशी केली. स्थावर मालमत्ता किंवा पूर्ववैमनस्यातून खून झाला आहे का? यादृष्टीने तपास केला असता तसे कोणतेही कारण पुढे आले नाही. अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी खुनाचा छडा लावला. (प्रतिनिधी)
असा झाला उलगडा
घटनास्थळाशेजारी असलेल्या शोभा नाना ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता त्यामध्ये संशयित आरोपी स्पष्टपणे दिसत होता. २५ ते ३० वयोगटातील तरुणाने अंगामध्ये पांढऱ्या रंगाची पँट, त्याच रंगाची कानटोपी व जोडून असलेले पांढऱ्या रंगाचे जर्किन घातले आहे. पायात चप्पल आहे. हातामध्ये काळ्या रंगाची पिशवी होती. त्यावरून लक्ष्मीपुरी पोलीस रस्त्यावरील फिरस्त्यांना टार्गेट करत त्या वर्णनाच्या व्यक्तीचा शोध घेत असता शुक्रवारी रात्री लक्ष्मीपुरी धान्य व्यापार पेठ परिसरात सीसीटीव्ही फुटेजमधील त्याच वर्णनाची व्यक्ती संशयितरित्या फिरताना दिसली. खुनावेळी आरोपीने जे कपडे घातली होते तेच कपडे त्याच्या अंगावर होते. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आणखी दोन साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. त्यामध्ये मुबारकसह आणखी एका साथीदाराचा समावेश आहे. रंकाळा परिसरात राहणाऱ्या पैलवानांसोबत हसनची ऊठबस असायची. ज्या दिवशी वृद्धाचा खून झाला. त्याच्या काही मिनिटांपूर्वी तेथून एक पैलवान चालत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे ‘त्या’ पैलवानाचा या खुनामध्ये समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हसनच्या पत्नीकडे लक्ष्मीपुरी पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिनेही हसनकडे पैलवान रोज यायचे, अशी माहिती दिली आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार
हसन मुल्लाणी हा सराईत गुन्हेगार आहे. सदर बजार परिसरात तो राहत होता. त्यानंतर काही वर्षांनी तो घराबाहेर पडला. फुटपाथवर रात्र घालवून तो दिवस काढत असे. स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी परिसरात त्याची वेश्या महिला व फिरस्त्यांमध्ये मोठी दहशत होती. त्यांना दमदाटी करून प्रसंगी मारहाण करून त्यांच्याकडून तो पैसे वसूल करत असे. वेश्या महिलांकडून तो प्रत्येकी १०० रुपये हप्ता रोज घ्यायचा. त्यानंतर रात्री फुटपाथवर झोपलेल्या फिरस्त्यांना मारहाण करून त्यांना लुटत असे. त्याने रेल्वे स्टेशन परिसरात नारळ विक्रेत्याच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. शाहूपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. काही वेश्या महिलांकडेही पोलिसांनी कसून चौकशी केली.
चित्रपट पाहण्याचा छंद
संशयित मुल्लाणी याला रोज चित्रपट पाहण्याचा छंद आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास तो उर्मिला, पद्मा, शाहू, अयोध्या यापैकी एका चित्रपटगृहामध्ये पत्नी, लहान मुलगी, मेहुणी व सासूच्यासोबत चित्रपट पाहत असे. त्यानंतर मद्यप्राशन करून रात्रभर तो फिरस्त्यांना टार्गेट करत असे. सध्या तो कुटुंबासमवेत भवानी मंडप, शिवाजी चौक परिसरात फूटपाथवर झोपत असे.