सीआयडी असल्याची बतावणी करून वृद्धास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST2020-12-05T04:51:41+5:302020-12-05T04:51:41+5:30
भरदिवसा घडला प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील संभाजी चौक ते आवाडे चित्रमंदिर मार्गावर मोटारसायकलवरून निघालेल्या वृद्धास ...

सीआयडी असल्याची बतावणी करून वृद्धास लुटले
भरदिवसा घडला प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील संभाजी चौक ते आवाडे चित्रमंदिर मार्गावर मोटारसायकलवरून निघालेल्या वृद्धास दोन अनोळखी व्यक्तींनी अडवून सीआयडी असल्याची बतावणी करून लुटले. त्यांच्याकडील पाच लाख ६० हजार रुपये किमतीचे चौदा तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन मोटारसायकलवरून पोबारा केला. याबाबत राजाराम रामेश्वरलाल माहेश्वरी (वय ६८, रा. लक्ष्मी प्रोसेसर्सजवळ) यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. भररस्त्यावर भरदुपारी घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, राजाराम हे बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी-व्यंकटेशनगर येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे मोटारसायकलवरून निघाले होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकलवरून येऊन राजाराम यांना अडविले व गावात रमेश याच्यावर चाकूहल्ला झाला आहे, वातावरण खराब असल्याची बतावणी करून अंगावरील सोन्याचे सर्व दागिने काढून गाडीच्या डिकीत ठेवण्यास सांगितले. त्यावेळी सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने पाठीमागून चालत येऊन पहिला व्यक्ती सीआयडी असल्याचे भासविण्यासाठी स्वत:कडील दागिने काढून बॅगेत ठेवले.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे भेदरलेल्या राजाराम यांनी त्यांच्याकडील ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ८० ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट व १० ग्रॅम वजनाची अंगठी असे एकूण पाच लाख ६० हजार रुपये किमतीचे चौदे तोळ्याचे दागिने काढून डिकीत ठेवले. दागिने मोजून ठेवूया म्हणून डिकीतून परत काढून हातचलाखी करत संशयितांनी दागिने घेऊन मोटारसायकलवरून पलायन केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजाराम यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे. त्यामध्ये हेल्मेट व मास्क घातलेले विना नंबरप्लेट मोटारसायकलवरून जाणारे दोघेजण आढळले आहेत. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
(फोटो ओळी)
०२१२२०२०-आयसीएच-०३
इचलकरंजीत दागिने लुटून मोटारसायकलवरून पळून जाणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.