दरोडेखोरांकडून वृद्ध दाम्पत्याचा खून

By Admin | Updated: August 7, 2014 01:03 IST2014-08-07T01:02:28+5:302014-08-07T01:03:41+5:30

हेब्बाळ-जलद्याळमधील घटना : ऐवज लंपास; दुुसऱ्या दिवशी घटना उघडकीस; गावात भीतीचे वातावरण

Old-born couple's murder by dacoits | दरोडेखोरांकडून वृद्ध दाम्पत्याचा खून

दरोडेखोरांकडून वृद्ध दाम्पत्याचा खून

नेसरी : हेब्बाळ-जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथे काल, मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याचा निर्घृण खून करून घरातील ऐवज लंपास केला. रामू जोती बामणे (वय ७०) व बायाक्का रामू बामणे (६२) अशी मृतांची नावे आहेत. ही धक्कादायक घटना आज, बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घरात केवळ मृत दाम्पत्यच राहत असल्याने या दरोड्यात चोरट्यांनी किती ऐवज लंपास केला याची माहिती मिळू शकली नाही. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नेसरीपासून आठ किलो मीटर अंतरावर असलेल्या व महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील हेब्बाळ-जलद्याळ येथील शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या आकस्मिक संकटाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित घरात रामू बामणे व बायाक्का बामणे दोघेच राहत होते. त्यांची मुले नोकरीनिमित्त मुंबईला असतात. मंगळवारी रात्री अज्ञात दरोडेखोरांनी या वृद्ध दाम्पत्याच्या डोक्यात जबर मारहाण केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नेसरी पोलिसांना या घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस निरीक्षक राकेश हांडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नेसरी-लिंगनूर मार्गावरील हेब्बाळ गावच्या वेशीवरील घरातच ही घटना घडल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घरातील लोखंडी तिजोरीतील व कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले आढळले. पेटी व प्लायवूडच्या कपाटातील वस्तूही बाहेर विस्कटलेल्या होत्या. सोने ठेवत असलेल्या डब्याही रिकाम्या अवस्थेत सापडल्या. बायाक्का यांचे माहेरही
हेब्बाळ-जलद्याळ असल्याने तेथील नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची माहिती मुंबईत राहणारे त्यांचे मुलगे संजय व अजित यांना दिली आहे.
रात्री उशिरा घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार व विभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांनी भेट दिली. जानबा जोती बामणे यांनी घटनेची पोलिसांत वर्दी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद सुरू होती. दरोडेखोरांच्या तपासासाठी उद्या, गुरुवारी श्वानपथक मागविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (वार्ताहर)

रामू व बायाक्का दोघेही नेहमीप्रमाणे मंगळवारी दिवसभर शेतात काम करून सायंकाळी घरी येताना गाडीतून जनावरांना वैरण घेऊन आले होेते. ती वैरणीची गाडी घरासमोर लावून रात्री जेवणानंतर ते झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी झाली तरी दरवाजा बंद असल्याने व गाडीतील वैरण तशीच शिल्लक असल्याने शेजारील जानबा भागोजी दळवी व विष्णू मारुती दळवी यांनी घराची पाहणी केली.
यावेळी घराच्या पुढील दरवाजाला आतून कडी होती. ती कडी हात घालून काढून घरात पाहिले असता रामू व बायाक्का हे वेगवेगळ्या दोन खोल्यांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

Web Title: Old-born couple's murder by dacoits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.