अंत्ययात्रेत वृद्धा झाली जिवंत!

By Admin | Updated: April 9, 2016 01:02 IST2016-04-09T01:02:32+5:302016-04-09T01:02:43+5:30

कुडित्रेतील घटना : खांदेकरी मुलाला झाली श्वास सुरु असल्याची जाणीव

Old age was alive in the funeral! | अंत्ययात्रेत वृद्धा झाली जिवंत!

अंत्ययात्रेत वृद्धा झाली जिवंत!

कोपार्डे : अपघातात गंभीर जखमी झालेली वृद्धा उपचाराला साथ देत नसल्याने डॉक्टरांनी घरी नेण्यास सांगितले. ती कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर अंत्ययात्रा सुरू झाली. स्मशानभूमी आता टप्प्यात आली असतानाच त्या वृद्धेचा श्वास सुरू असल्याचे खांदेकरी असलेल्या तिच्याच मुलाच्या लक्षात आले आणि अंत्ययात्रेतील सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आणि एकच गोंधळ उडाला. वनिता पांडुरंग भास्कर (वय ६०) असे या वृद्धेचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी कुडित्रे (ता.करवीर जि.कोल्हापूर ) येथे घडली. गुढीपाडव्याच्या दिवशीच या घटनेने दु:खाची जागा सुखाने घेतल्याचा अनुभव आला.
वनिता भास्कर गुरुवारी आपला मुलगा पिंटू भास्करबरोबर मोटारसायकलवरून गणपतीपुळे, पावस या ठिकाणी देवदर्शनाला गेल्या होत्या. परतत असताना पाचल-राजापूर दरम्यान रस्त्यावर असणाऱ्या गतीरोधकावर वनिता भास्कर यांचा तोल गेल्याने रस्त्यावर पडून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचा मुलगा पिंटूने स्थानिकांच्या मदतीने त्यांना प्रथम कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून एका खासगी रूग्णालयात त्यांना हलविण्यात आले. तेथेही डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, शुक्रवारी सकाळपासून त्या उपचाराला साथ देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना घरी आणले. रुग्णालयात व घरी आणल्यानंतरही वनिता या कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. अंत्ययात्रा सुरू झाली, थोड्या अंतरावर गेल्यानंतर खांदा देणाऱ्या त्यांच्या मुलग्याला आईचा श्वासोच्छ्वास सुरू असल्याचे लक्षात आले. त्यांनी आपल्या नातेवाइकाला याची कल्पना दिली. त्यामुळे अंत्ययात्रा थांबवून श्वासोच्छ्वास सुरू असल्याची खात्री अनेकांनी करून घेतली.
त्यानंतर वनिता या जिवंत असल्याचे लक्षात आल्याने तेथूनच त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. आता त्या उपचाराला साथ देत असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Old age was alive in the funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.