मलकापुरात अधिकारी, पदाधिकारी आमने-सामने

By Admin | Updated: February 19, 2016 00:17 IST2016-02-18T23:16:09+5:302016-02-19T00:17:17+5:30

विकासकामांवरून वाद : नागरिकांच्या प्रशासनाविरोधी तक्रारी; मुख्याधिकारी एकाकी

Officers, office bearers in Malakpur face-to-face | मलकापुरात अधिकारी, पदाधिकारी आमने-सामने

मलकापुरात अधिकारी, पदाधिकारी आमने-सामने

मलकापूर : पालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक डोळ््यासमोर ठेवून मलकापूर नगरपालिकेत कर्मचारी व पदाधिकारी यांच्यात विकासकामे आणि निधीच्या कारणांतून वादाची ठिणगी पडली आहे. कर्मचारी व विरोधी पक्ष पदाधिकारी यांच्यात वाद सुरू आहे.शहरातील नागरिकांच्या पालिका प्रशासनाविरोधी तक्रारी आल्या आहेत. कोट्यवधी रस्त्यांची विकासकामे करणाऱ्या मुख्याधिकारी प्रमोद सवाखंडे एकाकी पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सत्ताधारी गटदेखील त्यांची बाजू घेताना दिसत नाही. मलकापूर नगरपालिकेच्या साडे चार वर्षांत सुमारे सहा कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. पालिकेत सध्या शाहूवाडी व जनसुराज्य आघाडीची सत्ता आहे, तर सेनेचे पाच सदस्य विरोधी पक्षात आहेत. विधानसभेच्या निकालाचे पडसाद पालिकेत उमटून तालुक्याच्या राजकारणाबरोबर पालिकेत राष्ट्रवादी व शिवसेना यांची जवळीक वाढली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी असे समीकरण न राहता शहराच्या विकासासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे या मुद्द्यावर एकमत झाले.विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जनसुराज्यचे दोन नगरसेवक फोडले. येथूनच पालिकेच्या राजकारणाची समीकरणे बदलली. जनसुराज्य पक्षाने आपली ताकद दाखविण्यास सुरुवात करताच आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. पालिकेतील ठेका वेतन कामगार, विठ्ठल मंदिर संरक्षक भिंत बांधकाम, शहरातील विकासकामांवर झालेल्या निधीच्या चौकशीची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यात मुख्याधिकारी व प्रशासन भरडले जात आहे. मात्र, सत्ताधारी गटही मुख्याधिकाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. नागरिकांच्या तक्रारी दाखल होताच सर्वच राजकीय गट आपला त्यामध्ये वाटा नाही, असे वागत आहेत. यामध्ये प्रशासन व पदाधिकारी वाद पेटला आहे. मुख्याधिकारी यांची कऱ्हाड येथे झालेली बदली रद्द झाल्यामुळे मुख्याधिकारी नाराज आहेत.
पालिकेच्या प्रशासनामध्ये स्थानिक कर्मचारी असल्यामुळे पालिकेची गोपनीय माहिती बाहेर सांगितली जाते. प्रत्येक कामगार नगरसेवकाशी जोडला गेला आहे. त्यामुळे प्रशासनातील कामगारांमध्ये दोन गट पडले आहेत. काही कामगार मुख्याधिकारी व लेखाधिकारी यांना सहकार्य करीत नाहीत. पालिकेच्या जिवावर गलेलठ्ठ पगार घेऊन पालिकेची बदनामी करण्यात काही कामगार आघाडीवर आहेत. एकंदरीत पालिकेचे पदाधिकारी व प्रशासन यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.


मुख्याधिकारी प्रमोद सवाखंडे यांच्या पाठीशी राहून खंबीरपणे त्यांना साथ देणार आहे.
-प्रकाश पाटील
(आघाडी प्रमुख, राष्ट्रवादी)

शासनाच्या नियमानुसार शहराच्या विकासासाठी निधी खर्च केला आहे. मूलभूत सुविधांसाठी येथून पुढे प्राधान्य देणार आहे.
- प्रमोद सवाखंडे
(मुख्याधिकारी)

Web Title: Officers, office bearers in Malakpur face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.