कचरा उठावासाठी पदाधिकारी आक्रमक

By Admin | Updated: September 9, 2016 01:12 IST2016-09-09T00:59:16+5:302016-09-09T01:12:52+5:30

वाहने नादुरुस्तच्या कारणाने संतप्त : अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा

Officer Offensive to lift the garbage | कचरा उठावासाठी पदाधिकारी आक्रमक

कचरा उठावासाठी पदाधिकारी आक्रमक

कोल्हापूर : गणेशोत्सवासारखा अत्यंत महत्त्वाचा सण सुरू असल्याने शहरातील कचरा दररोज उचलला जावा, अशी अपेक्षा असताना महानगरपालिका प्रशासनाकडून वाहने नादुरुस्त असल्याचे कारण दिले जात असल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, तसेच वर्कशॉप प्रमुख रावसाहेब चव्हाण यांना चांगलेच फैलावर घेतले. येत्या दोन दिवसांत जर शहरातील कचरा उठाव झाला नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा महापौर अश्विनी रामाणे यांनी यावेळी दिला. कचरा उठावाची सर्व वाहने तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, असे आदेश महापौर रामाणे यांनी प्रशासनाला दिले.
गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेची कचरा उठाव करणारी सहा ते सात आर. सी. वाहने बंद आहेत. त्यामुळे कचरा उठाव करण्याच्या कामात विस्कळीतपणा येत आहे. प्रभागात जेथे कंटेनर आहेत, त्यामध्ये कचरा साचून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होत आहे.
कचरा उठाव करा म्हणून नगरसेवकांनी सांगितले तरी वाहने उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे संतप्त
झालेल्या महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, कॉँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक राहुल माने, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, मधुकर रामाणे, आश्पाक आजरेकर, आदींनी सुभाष स्टोअर येथे जाऊन वर्कशॉपचे प्रमुख रावसाहेब चव्हाण यांच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी सुटे भाग उपलब्ध नसल्याने पाच आर. सी. वाहने नादुरुस्त असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनाही त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आले. रावसाहेब चव्हाण यांच्याकडून कामाचा
अनुभव चांगला नाही; त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे शारंगधर देशमुख यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सुटे भाग उपलब्ध नसल्याचे अतिशय बालिश उत्तर दिल्यामुळे पदाधिकारी चांगलेच खवळले.
त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. जर दोन दिवसांत शहरातील कंटेनरमधून साचलेल्या कचऱ्याचा उठाव झाला नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा दमच महापौरांनी दिला.

Web Title: Officer Offensive to lift the garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.