अंगारकीनिमित्त उसळला भाविकांचा सागर
By Admin | Updated: December 9, 2014 23:21 IST2014-12-09T22:22:27+5:302014-12-09T23:21:59+5:30
अंगारकीनिमित्त उसळला भाविकांचा सागर

अंगारकीनिमित्त उसळला भाविकांचा सागर
गणपतीपुळे : श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आज (मंगळवार) अंगारकीनिमित्त घाटमाथ्यावरील हजारो भाविकांनी स्वयंभू श्रींच्या दर्शनाला गर्दी केली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, कराड, मिरज या ठिकाणच्या भाविकांबरोबरच मुंबई, पुणे येथील हजारो भाविकांचा जनसागर येथ उसळला होता.
अंगारकीनिमित्त संस्थानतर्फे स्वयंभू गणेश मंदिर पहाटे ४ वाजता खुले करण्यात आले. पुजा, मंत्रपुष्प, आरती झाल्यानंतरमंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले. यावेळी दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. रांगेमध्ये असलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. मंदिर परिसरात भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेऊन मालगुंड येथील वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थान समितीचे सुरक्षारक्षक, रत्नागिरीतल्या अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टचे स्वयंसेवक ठिकठिकाणी गस्त घालत होते. समुद्र किनाऱ्यावर गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सुरक्षारक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसर व गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्र या दोन्ही ठिकाणांहून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ध्वनीक्षेपकावरुन विशेष सूचना देण्यात येत होत्या.
अंगारकी चतुर्थीनिमित्ताने सायंकाळी ४ वाजता स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक हजारोंच्या गर्दीत व मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत काढण्यात आली. अंगारकीमुळे वाहनांच्या पार्किंगची खास व्यवस्था करण्यात आली होती. (वार्ताहर)
अंगारकीनिमित्त विविध गणेश मंडळांकडून भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाप्रसादाबरोबरच खिचडी प्रसादही उपलब्ध करुन देण्यात आला.
यावेळी समुद्र स्नानासाठी पर्यटक गर्दी करतात. येणाऱ्या भाविकांचा लोंढा समुद्र चौपाटीकडे वळताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संस्थानतर्फे उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. त्यामुळे समुद्र चौपाटीवर जाण्या-येण्यासाठी दोन स्वतंत्र उड्डाणपूल तयार करण्यात आल्याने ते आकर्षण ठरले.