अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:20+5:302021-07-07T04:31:20+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. ज्यांच्या सेवेला ३ वर्षे व ६ वर्षांचा कालावधी ...

अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. ज्यांच्या सेवेला ३ वर्षे व ६ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, ते सध्या बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची त्यांच्या पदानुसार व कार्यकालानुसार सदर तीन वर्षांनी बदली होत असते. दरवर्षी एप्रिल व मेमध्ये या सर्वसाधारण बदल्या होत असतात. मात्र, गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने बदलीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली. बदलीसाठी ३१ जुलै २०२० पर्यंत दिलेली मुदत ऑगस्टपर्यंत वाढली. त्यानंतर आता नवीन वर्ष सुरू होऊन सहा महिने झाले तरी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. शासनाने ३० जूनपर्यंत या बदल्या करण्याचे जाहीर केले होते; मात्र अजून त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता एकाच पद्धतीचे काम करून कर्मचारी कंटाळले आहेत. दुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेषत: महिलांनाही जेथे गैरसोयींची सामना लागत आहेत. त्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना आता बदलीचे वेध लागले आहेत.
--
प्रवास, सोयीचा विचार व्हावा
बदली करताना कार्यालयात जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे, याचा विचार केला जावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दोन टोकाचे तालुके असले तरी प्रवास खर्च, येण्या-जाण्याचा वेळ, दुर्गम भाग असेल तर तिथे जाता-येतानाच्या अडचणी, कौटुंबिक स्थिती असे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे सगळंच गैरसोयीचं ठरत असेल तर कार्यक्षमतादेखील कमी होते. त्यामुळे राहत असलेल्या तालुक्यापासून जवळच्या तालुक्यात बदली व्हावी, असे कर्मचाऱ्यांचे मत आहे.