के.पीं.विरोधात मोट
By Admin | Updated: August 13, 2014 23:32 IST2014-08-13T23:07:44+5:302014-08-13T23:32:02+5:30
कॉँग्रेस कार्यकर्ते आक्रमक : विधानसभेत पराभव करण्याचा निर्धार

के.पीं.विरोधात मोट
कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड तालुक्यांत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आतापर्यंत ज्यांनी गाडण्याचे काम केले त्या आमदार के. पी. पाटील यांना आधी गाडण्याचे काम आपण सगळेजण मिळून करुया आणि नंतर कोण आमदार व्हायचे ते ठरवूया, असा पराकोटीचा निर्धार राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आज, बुधवारी येथे झालेल्या मेळाव्यात केला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांच्या समोरील अडचणी आता आणखी बिकट झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका काय असावी, यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आज, बुधवारी दुपारी गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील सभागृहात मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याला दोन्ही तालुक्यांतून किमान अडीचशे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी दूध संघाचे संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला आणि कार्यकर्त्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडावी, अशी विनंती केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर घणाघाती टीका केली.
गेल्या वीस वर्षांत राधानगरी, भुदरगड तालुक्यांतून कॉँग्रेस हद्दपार झाली असून, कार्यकर्ते मृतावस्थेत असल्यासारखी परिस्थिती आहे. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळत प्रत्येकवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसला मदत करायची आणि निवडणुका जिंकल्या की कॉँग्रेस कार्यकर्त्यांना गाडायचे काम करायचे ही निती राष्ट्रवादीची राहिली आहे. त्यामुळे आता वेळ आलीच तर आधी त्यांना गाडण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करुया, अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त झाल्या.
राष्ट्रवादी हा आपला खरा शत्रू आहे. तरीही आम्ही के. पीं.ना विजयी करत आलो; पण त्यांनी आमची कामे केली नाहीत. यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होऊ लागले आहे. म्हणूनच त्यांची यापुढे फार भीडभाड ठेऊ नये. आपण सगळे आधी एक होऊन आपली एकी शेवटपर्यंत कायम ठेवली पाहिजे. राधानगरी तालुक्यातील पाच नेत्यांनी आधी एकत्र बसून पुढे कोणी निवडणूक लढवायची हे ठरवा. कार्यकर्ते त्या निर्णयावर ठाम राहून काम करतील, असा विश्वासही काहींनी दिला.
मेळाव्याला तालुक्यातील कॉँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. अरुणकुमार डोंगळे, हिंदुराव चौगुले, उदयसिंह पाटील कौलवकर, पी. डी. धुंदरे, विजयसिंंह मोरे, नंदकुमार सूर्यवंशी, सदाशिव चरापले, अभिजित तायशेटे, नंदकिशोर सूर्यवंशी, सुभाष नाना पाटील, सुधाकर साळोखे, डी. एस. पाटील, जगदीश लिंग्रस, रमेश वारके, आदींनी मेळाव्याचे संयोजन केले होते.